Maval Political News l मावळातील सर्व पक्षीय अपक्ष उमेदवाराला नेमका कोणत्या पक्षाचा अधिकृत पाठिंबा ?
वडगाव मावळ : मावळ विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराला सर्व पक्षीय पाठिंबा असल्याचा कांगावा केला जात असला तरी या पक्षाला नेमका कोणत्या पक्षाने अधिकृत पाठिंबा दिला आहे हे मात्र अनुत्तरीतच आहे. महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भाजपातील काही नेत्यांनी आमदार सुनील शेळके यांच्याशी फारकत घेत आपल्या पदांचे राजीनामे देत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला असला तरी तो पक्षाचा अधिकृत पाठिंबा नाही. काही विशिष्ट हेतूने एकत्रित आलेल्या व्यक्तींनी तो पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष यांनी पाठिंबा दर्शविला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत पत्रक त्या स्वरूपाचे काढण्यात आलेले नाही.
महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी पक्षाकडून याबाबतचे कोणतेही पत्रक पाठिंबाचे देण्यात आलेले नाही. तीच परिस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहे. तालुकाध्यक्ष यांनी पाठिंबा दर्शवला असला तरी पक्षाकडून कोणतेही पाठिंबाचे अधिकृत पत्र अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेले नाही. मावळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. जोपर्यंत पक्ष आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षा मधून बाहेर पडत बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्या पक्षाकडून देखील त्यांना पाठिंबा देण्यात आलेला नाही. असे असताना तालुक्यातील काही चाणक्य नेते कशाच्या आधारावर अपक्ष उमेदवार सर्वपक्षीय उमेदवार असल्याचे उघडपणे सांगत आहेत, याची सध्या मावळ तालुक्यामध्ये चर्चा रंगत आहे. काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर पक्षाचा आदेश डावलून महायुतीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर गेल्यामुळे सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर अपक्ष उमेदवाराच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना शोकास नोटीस पक्षाकडून बजावण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने मावळ तालुक्यामधील कोणत्याही उमेदवाराला अधिकृतरित्या पाठिंब्याचे पत्र दिलेले नाही केवळ तालुकास्तरावर आपले हितसंबंध जोपासण्यासाठी तालुका अध्यक्षांनी आपल्या सोयीनुसार पाठिंबे जाहीर केले आहेत. आतापर्यंत कोणीही त्यासंबंधीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केलेले नाही.
महायुतीकडून मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महायुतीमधील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आज तरी सुनील शेळके यांच्या सोबत आहेत. महा विकास आघाडी कडून मावळ विधानसभेची जागा नेमक्या कोणत्या पक्षाला सुटली हे देखील अद्याप या महाविकास आघाडी मधील घटक पक्षांना ठोसपणे सांगता येत नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मदत संपून गेली असल्यामुळे महाविकास आघाडीला मावळ तालुक्यामधून एकही उमेदवार मिळालेला नाही ही त्यांच्यासाठी शोकांतिका आहे. अपक्ष उमेदवार हे जोपर्यंत स्वतः पुढे येऊन आपण कोणत्या पक्षाला निवडून आल्यानंतर पाठिंबा देणार ही अधिकृतपणे सांगत नाही तोपर्यंत मावळ तालुक्यातील राजकीय पक्षांमधील हा गोंधळ असाच कायम राहणार आहे. मावळ तालुक्यातील राजकीय पक्षांच्या या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र संभ्रमात आहे. पक्षाचा आदेश पाळायचा की तालुका अध्यक्षांचा हेच समजत नसल्याने अद्यापही कार्यकर्ते वेट अँड वरच्या भूमिकेमध्ये आहेत. अनेकांनी मात्र जो पक्षाचा अधिकृत आदेश असेल त्याच आदेशाची आम्ही पालन करणार असे सांगत तालुका अध्यक्षांच्या पाठिंबांवर हरकती घेतल्या आहेत. अपक्ष उमेदवार हा सर्व पक्षीय उमेदवार आहे असे भासवत काही चाणक्य मंडळी मावळ तालुक्यातील सर्व सामान्य मतदानामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात मावळ तालुक्यातील राजकारणामध्ये कोणते कोणते ट्विस्ट येणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.