मावळचा द्रष्टा नेता हरपला l मावळ भूषण – शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन

लोणावळा : मावळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमधील पितामह असलेला द्रष्टा नेता म्हणून ज्यांची ओळख होती. ते मावळ भूषण – शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी (30 जून) रात्री आजारपणाने व वृद्धापकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मावळ तालुक्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मावळ तालुक्याला शैक्षणिक हब बनविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक म्हणून सामाजिक कार्यात सक्रीय झालेले कृष्णराव भेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच 1972 ते 1978 व 1978 ते 1980 असे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. एस काँग्रेस मध्ये गेल्यानंतर 1993 साली ते विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून गेले होते. त्याची दूरदृष्टी व मावळ तालुक्याच्या विकासासाठी झटण्याची उमेद यामुळे आज मावळ तालुक्यात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी, लोणावळा एमआयडीसी, लोणावळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे देखील त्यांचेच व्हिजन आहे. संत तुकाराम साखर कारखाना निर्मितीमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा होता.
देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्याच माध्यमातून मावळ तालुक्यामधील सामाजिक, राजकीय शैक्षणिक व सहकार क्षेत्रामध्ये भरीव कामे झाली आहेत. माजी आमदार कृष्णराव भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असले तरी मावळ तालुक्याच्या सर्वपक्षीय राजकारणामध्ये त्यांचा दबदबा होता. त्यांच्या शब्दाला सर्वच पक्षामधून मान दिला जात असे. तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना वेगळे असे स्थान होते. मावळ तालुक्याच्या समग्र विकासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते.
अशा या मावळ तालुक्याच्या विकास पुरुषाला मावळ माझा न्युज कडून भावपूर्ण श्रद्धांजली ???? ????