Breaking news

श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड येथे अमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

देहूगाव : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड येथे ‘अमली पदार्थ विरोध’ दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली.

       कार्यक्रमास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त आयुष्याची गरज पटवून दिली. ते म्हणाले, "अमली पदार्थांचे व्यसन हे जीवनाच्या विनाशाचे कारण बनते. त्यापासून दूर राहणे, हे चांगल्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. केवळ स्वतःच नव्हे तर समाजातही या बाबत जागरूकता पसरवायला हवी."

      विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, "भविष्य उज्वल बनवायचे असेल तर योग्य मार्ग निवडणे अत्यावश्यक आहे. एकदा का चुकीच्या मार्गावर पाऊल पडले, तर पुन्हा योग्य मार्गावर येणे कठीण होते. म्हणूनच सुरुवातीपासूनच अमली पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे."

      कार्यक्रमास पोलीस हवालदार प्रशांत वाबळे, मयूर घागरे, ऋतुजा सातूरकर, विद्या पवळे, विमल इंदे, पर्यवेक्षिका विभावरी अभंग, सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र काळोखे, क्रीडा शिक्षक निलेश मानकर, अरुण डिंबळे, ज्येष्ठ अध्यापिका शिला राजे, अनिता काळे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, जबाबदारीची जाणीव आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

इतर बातम्या