मोठी बातमी l एकवीरा देवी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; 7 जुलैपासून अंमलबजावणी

लोणावळा : महाराष्ट्राचे कुलदैवत व लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या निर्णयानुसार, हा ड्रेस कोड 7 जुलै 2025 पासून प्रत्यक्षात येणार आहे.
शुक्रवारी (27 जून) ट्रस्टच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ड्रेस कोडचे नियम पुढीलप्रमाणे असतील –
महिलांसाठी : साडी, सलवार-कुर्ता किंवा अन्य भारतीय पारंपरिक पोशाख
पुरुषांसाठी : धोतर-कुर्ता, पायजमा-कुर्ता, पँट-शर्ट किंवा पारंपरिक वेशभूषा
मंदिरात येताना वेस्टर्न ड्रेस, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स, हाफ पँट्स, फाटलेली जीन्स यांसारखे पोशाख वर्ज्य करण्यात आले आहेत.
बैठकीस उपस्थित प्रमुख सदस्य :
ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, सहखजिनदार विकास पडवळ तसेच विश्वस्त पूजा अशोक पडवळ आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
उद्देश : मंदिरातील धार्मिक वातावरणाची पवित्रता टिकवण्यासाठी आणि पारंपरिक मूल्यांना सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.