Lonavala News l लोणावळ्यातील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; लोणावळा मनसेच्या तत्परतेने कुटुंबाला मिळाली मदत

लोणावळा : लोणावळा शहरातील बारा बंगला परिसरात स्थित Automatic Pvt. Ltd. या कंपनीत कार्यरत असलेले दत्तात्रय कोळसकर यांचे अचानक चक्कर येऊन पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन दुःखद निधन झाले. गेले सहा महिने ते या कंपनीत कार्यरत होते. कोळसकर हे एक अत्यंत गरजू कुटुंबातील सदस्य होते. 9 जून रोजी ही घटना घडली होती.
या घटनेची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले, अमित भोसले, दिनेश कालेकर, संदीप बोभाटे, अभिजित फासगे, मधुर पाटणकर यांसह मनसेचे पदाधिकारी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, कंपनी व मृताच्या कुटुंबीयांमध्ये मदत व जबाबदारी संदर्भात वाद सुरू असल्याचे समजले. कामगार कायद्याच्या सर्व बाबींची पूर्तता करत असल्याचे सांगत कंपनीने सुरुवातीला जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, मनसेच्या ठाम आणि स्पष्ट भूमिकेमुळे कंपनीने आपली भूमिका बदलत मदतीस तयार होण्याचा निर्णय घेतला.
मनसेच्या हस्तक्षेपामुळे कंपनीने मृताच्या तीन अल्पवयीन मुलींना प्रत्येकी एक लाख रुपये अशी एकूण तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मान्य केले. कंपनीचे मालक शरद भाट हे मुंबईतील असल्यामुळे, मनसेचे वरिष्ठ नेते नितीन सरदेसाई आणि बाबू वागस्कर यांचे देखील या प्रकरणात मोलाचे मार्गदर्शन लाभले.
10 जून रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते व मनसेचे रमेश म्हाळस्कर, दिनेश कालेकर, अमित भोसले, मधुर पाटणकर, अभिजित फासगे, विपुल माने, संदीप बोभाटे, विश्रांत साठे, सुनील सोनवणे, सुभाष रेड्डी, श्रेयस कांबळे, कैवल्य जोशी इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोळसकर यांच्या पत्नी व मुलींना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. मनसेच्या वतीने कंपनीचे मालक शरद भाट यांचे, त्यांनी मनसेच्या शब्दाला दिलेला मान आणि कुटुंबाला दिलेल्या मदतीबद्दल, विशेष आभार मानण्यात आले.
मनसे लोणावळा शहर विभाग कोळसकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, पुढील काळातही त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून उभे राहील, असे आश्वासन मनसेच्या वतीने देण्यात आले.