लोणावळा पोलीस ॲक्शन मोडवर l लोणावळा बाजारपेठ भागामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 118 वाहनांवर कारवाई; 1 लाख 13 हजार रुपये दंड

लोणावळा : लोणावळा बाजारपेठ भागामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 118 वाहनांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करत एक लाख 13 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. लोणावळा शहर चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गासह लोणावळा बाजारपेठेमध्ये दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लोणावळा बाजारपेठेमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास हा येथील स्थानिक नागरिकांना व स्थानिक वाहनचालकांना सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा दोनच दिवसापूर्वी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या श्रीशैल चिवडशेटे यांनी आढावा घेत मावळा पुतळा चौक ते रेल्वे स्टेशन कमानी पर्यंत प्लास्टिक बॅरियर लावत वाहतूक नियमानाचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केला आहे. तसेच लोणावळा बाजारपेठ ते नवीन पोलीस स्टेशन इमारत दरम्यान वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या वाहनांवर आज दंडात्मक कारवाई मोहीम राबवण्यात आली. तब्बल 118 वाहनांवर दिवसभरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. बाजारपेठेमध्ये रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्यामुळे पायी चालणारे नागरिक तसेच स्थानिक वाहन चालक यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी सदरची कारवाई मोहीम सुरू करण्यात आली असून सर्व वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. ज्या दुकानदारांनी आपल्या दुकानांचे फलक रस्त्यावर उभे केले आहेत ते त्यांनी तात्काळ काढून घ्यावेत अशा सूचना यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.