Breaking news

कुसगाव येथे अनधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी 83 लाख 66 हजार रुपयांचा दंड

लोणावळा : कुसगाव बु. येथील जमीन गट नंबर 235 मधून अनाधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी जागा मालक अखिल आगरवाल यांना 83 लाख 66 हजार 400 रुपयांचा दंड केला आहे. 25 मे 2025 रोजी हा आदेश दिला आहे. कुसगाव तलाठी यांनी 2020 साली या जागेचा पंचनामा करत सदर जागेमधून 3486.45 ब्रास इतके अनधिकृत गौण खनिज उत्खन झाले असल्याचा अहवाल तहसीलदार मावळ यांना सादर केला होता. 

     कुसगाव बुद्रुक येथील जमीन गट नंबर 235 या ठिकाणी कुसगाव तलाठी यांनी 31 जानेवारी 2020 साली पंचनामा केला असता सदर जागेमधून 3486. 45 ब्रास गो खनिज उत्खनन झाले असल्याचा अहवाल मावळ तहसीलदार यांना सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने सदर जागेचे मालक अखिल अगरवाल यांना खुलासा करण्याबाबत कळवले होते. मात्र त्यांनी कोणताही खुलासा न केल्याने त्यांना वरील रकमेचे दंड आकारणी करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी मावळ प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करत आपली बाजू मांडली होती. त्या युक्तिवादानुसार व सादर केलेल्या कागदपत्रानुसार अखिल अगरवाल यांना करण्यात आलेला दंड प्रांत अधिकारी यांनी रद्द केला होता. मात्र त्या निर्णयाच्या विरोधामध्ये लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी पुन्हा 2021 साली जिल्हाधिकारी कार्यालय खाणिकर्ण विभाग यांच्याकडे सदर प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या मागणी च्या आधारे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करत वादी व प्रतिवादी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी याप्रकरणी अगरवाल यांनी त्यांच्या मालकीच्या जागेमधून उत्खनन झालेले नाही याबाबतचे कोणतेही पुरावे सादर न केल्यामुळे त्यांना पुन्हा वरील रकमेचे दंड आकारणी केली आहे.

इतर बातम्या