Breaking news

लोणावळा कैलासनगर स्मशानभूमी मधील बंद अवस्थेत असलेली गॅस शवदाहिनी पुन्हा कार्यान्वित करा – शिवसेना ठाकरे पक्ष

लोणावळा : लोणावळा शहरातील कैलास नगर या स्मशानभूमीमध्ये बसवण्यात आलेली गॅस शवदाहिनी मागील काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. ती शवदाहिनी लवकरात लवकर कार्यान्वित करा अशी मागणी लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

      याविषयी बोलताना लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख परेश बडेकर म्हणाले, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यामध्ये अंत्यविधी साठी लागणारी लाकडे ही भिजलेली असतात त्यामुळे अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लाकडी खरेदी करण्यासाठी दर देखील जास्त असल्यामुळे तो सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. लोणावळा नगरपरिषदेने याच सर्व बाबींचा विचार करत व प्रदूषण रोखण्यासाठी लोणावळा बाजारपेठे मधील कैलास नगर या स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसवली होती. सुरुवातीला काही दिवस योग्य प्रकारे ती चालू होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ती बंद अवस्थेमध्ये आहे. लोणावळा नगरपरिषदेने सदरची गॅस शवदाहिनी लवकरात लवकर कार्यान्वित करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याच निवेदनाच्या माध्यमातून लोणावळा शहरातील रस्त्यांवरील पॅचवर्क कामे लवकरात लवकर व चांगल्या दर्जाची करून घेण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

    यावेळी शिवसेना लोणावळा शहर प्रमुख परेश बडेकर, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना पुणे जिल्हा सह संपर्क संघटिका शादान चौधरी, पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, मारुती खोले, अनिल कडू, जयवंत दळवी व शिवसैनिक उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करा 

लोणावळा शहरांमधून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुणे जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी महोदय यांचा आदेश असताना देखील या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांची संख्या देखील वाढली आहे. लोणावळा शहरातील ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सदर बंदी आदेशाचे कडक पालन करत अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणी लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोणावळा शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

इतर बातम्या