निष्काळजीपणा नडला ! बोट उलटल्याने ते दोन तरुण पवना धरणात बुडून मयत झाले; दोघांचे मृतदेह शोधण्यात यश
लोणावळा : पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा पवना धरणाच्या जलाशयामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना बुधवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. जलाशयामध्ये बोटीमधून फेरफटका मारत असताना बोट पलटी झाल्याने हा अपघात होऊन दोघेजण पाण्यात बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात आला तर दुसरा मृतदेह गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक या टीमने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही दिवस शोध मोहीम राबवत धरणामधून हे मृतदेह बाहेर काढले आहेत. दुधीवरे गावाच्या जवळ जलाशयात ही घटना घडली आहे.
मयूर रवींद्र भारसाके (वय- 25) व तुषार रवींद्र अहिरे (वय- 26, दोघेही मूळ रा. पद्मावती नगर, वरणगाव रोड, भुसावळ) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे नोकरीस असणारे आठ मित्र बुधवारी सकाळी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. दुधिवरे भागातील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यातील काही जण हे खाजगी बोटी मधून धरणामध्ये फेरफटका मारायला गेले होते. दरम्यान बोट पलटी झाल्याने एक जण पाण्यामध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी घेतली असता ते दोघेही पाण्यामध्ये बुडाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक यांना शोध मोहिमेसाठी बोलवण्यात आले. शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढला गुरुवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुसरा मृतदेह देखील पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, युवराज बनसोडे, सिताराम बोकड, नवनाथ चपटे, नितीन कदम हे पुढील तपास करत आहेत.
लाईफ जॅकेट विनाच गेले पाण्यात ?
पवना धरणाच्या जलाशयामध्ये दोन तरुण बुडून मयत झालेली घटना ही दुःखद असली तरी या घटनेला नेमके जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. जे तरुण खाजगी बोट घेऊन पाण्यात गेले होते त्यांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते, दुसरे म्हणजे सदर खाजगी बोट पाण्यामध्ये फिरवण्यासाठी परवानगी आहे का ? पवनाधरण परिसरामध्ये अशा किती खाजगी बोट पाण्यात फिरत आहेत ? पाटबंधारे विभाग यावर काही कारवाई करते का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून या सर्व घटनेला जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.