Breaking news

Burning Car l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

वडगाव मावळ : जुना मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याकडे निघालेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी (दि. 3 जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल शीतलसमोर घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडी पूर्णतः जळून खाक झाली.

       पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इरटिका (एमएच 42 बीबी 4465) ही कार पुण्याकडे जात होती. दरम्यान, गाडीत तांत्रिक बिघाडामुळे शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील दोघेजण प्रसंगावधान राखत वेळीच गाडीतून बाहेर पडल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच वडगाव नगरपंचायत व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. लीडिंग फायरमन ताहीर मोमीन, समीर दंडेल, प्रदीप तुमकर, विनोद ढोरे, रियाज मुलानी, धीरज शिंदे आणि भास्कर माळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

इतर बातम्या