सार्थक वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अत्याधुनिक इंटरॲक्टिव्ह विज्ञान प्रयोगशाळा भेट

पवनानगर (प्रतिनिधी) : पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेत आता विद्यार्थ्यांना विज्ञानाचा सखोल अनुभव देणारी अत्याधुनिक इंटरॲक्टिव्ह विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे. पुणे, कोथरूड येथील सार्थक वेल्फेअर फाउंडेशनच्या सहकार्याने तब्बल सात लाख रुपये किंमतीचे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व गणिताचे मॉडेल्स व अन्य प्रयोगशाळेचे साहित्य शाळेला प्रदान करण्यात आले.
या प्रयोगशाळेचे उद्घाटन सार्थक वेल्फेअर फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती नामजोशी व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते झाले. यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष मोहोळ यांच्या पुढाकारातून ही प्रयोगशाळा साकारली गेली.
कार्यक्रमास सार्थक फाउंडेशनचे सिद्धेश पुरंदरे, संग्राम मदने, महेशभाई शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, तसेच पालक प्रतिनिधी सुनिल (नाना) भोंगाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर व नारायण कालेकर, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे आणि पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी स्वाती नामजोशी म्हणाल्या, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांचा विकास करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, पुढील काळात CSR फंडच्या माध्यमातून अधिक उपक्रम राबविणार आहोत." संतोष खांडगे यांनीही ग्रामीण भागातील गुणवत्तेचे कौतुक करत सार्थक फाउंडेशनच्या कार्याचे अभिनंदन केले. प्रयोगशाळेतील विविध मॉडेल्सची पाहणी सर्व मान्यवरांनी केली. यावेळी विज्ञान विभाग प्रमुख वंदना मराठे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. याप्रकल्पासाठी राजकुमार वरघडे व विजय वरघडे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रकल्प सादरीकरण वंदना मराठे यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश ठोंबरे यांनी केले.