Breaking news

Maval Political News l चिंचवड मधील महायुतीचा तिढा सुटला मावळातील तिढा कधी सुटणार ?

आमदार सुनील शेळके यांच्याशी झालेला खास संवाद

1] पिंपरी चिंचवड मध्ये नाना काटे यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा दिला तसे चित्र मावळात का दिसत नाही ?

उत्तर : मावळातील महायुतीचा तिढा सुटत नसल्याने नाना काटे हे निवडणूक लढविण्यवर ठाम होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मी स्वतः नाना काटे यांच्याशी बोललो. मावळातील भेगडे जनता पार्टी वगळता भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकारी हे माझ्या सोबत आहेत. 2019 पेक्षा जास्त प्रमाणात मला भाजपचा पाठिंबा असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाना यांच्याशी चर्चा करत मावळात भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सुनील शेळके यांचे काम करतील, मी स्वतः मावळात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महायुती उमेदवार शंकर जगताप यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. येत्या काळात काही ठराविक मंडळी वगळता उर्वरित पक्ष आदेश पाळणारे भाजपचे कार्यकर्ते माझ्या सोबत असतील हा माझा विश्वास आहे.

2] भाजपाचे किती लोक आपल्याला मदत करतील ?

उत्तर : भेगडे जनता पार्टी वगळता बाकी उर्वरित निष्ठावंत भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे महायुतीचा धर्म पाळतील व मला मतदान करतील हा माझा विश्वास आहे. महायुती मधील घटक पक्ष असलेल्या माझ्या राष्ट्रवादी पक्षासह शिवसेना शिंदे पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे सर्व पूर्ण ताकतीने माझ्या पाठीशी उभे आहेत. 2019 पेक्षा जास्त मताधिक्य मला यावेळेस मिळेल हा माझा विश्वास आहे.

3] भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यावर नाराज आहेत याबद्दल काय सांगाल ?

उत्तर : भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते माझ्यावर नाराज आहेत असे जे सांगितलं जात आहे हे धांधत खोटे आहे. काही ठराविक मंडळी त्यांचा स्वार्थ साधता आला नाही म्हणून हा अपप्रचार करत आहेत. मी मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला व शहरांना भरघोस असा निधी दिलेला आहे. त्या ठिकाणी कोण सरपंच आहे, कोण नगराध्यक्ष आहे याचा विचार केलेला नाही, त्यामुळे या आरोपात तथ्य नाही. मावळ तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच निष्ठावंत भाजप कार्यकर्ता हा माझ्या पाठीशी महायुतीचा घटक म्हणून उभा राहील.

4] मावळ तालुक्यात आपण हुकूमशाही पद्धतीने वागत आहात असा आरोप आपल्यावर होतोय ?

उत्तर : मी जर हुकूमशाही पद्धतीने वागलो असतो तर मावळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला नसता व प्रेम ही दिलं नसतं. मी मावळ तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिक याला केंद्रबिंदू मानत विकास कामे केली आहेत व यापुढे करत राहणार आहे. हा सर्वसामान्य मतदारांना विश्वास असल्यामुळे आज मी ज्या ज्या ठिकाणी संवाद मेळाव्यासाठी जात आहे, त्या त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसते. यावरूनच मी हुकूमशाही पद्धतीने वागलो की लोकशाही पद्धतीने वागलो हे स्पष्ट होते. काही लोकांना त्यांच्या मनासारखे लाभ मिळाले नाहीत म्हणून ते माझ्यावर अशा पद्धतीची टीका टिप्पणी करत आहे.

5] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रचारासाठी मावळात येणार आहेत ?

उत्तर : महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री करणे हा आमचा प्रत्येकाचा संकल्प आहे. याकरिता महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मावळ तालुक्यामध्ये भेगडे जनता पार्टी या गटाने महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ते दबाव टाकत काम करण्यापासून रोखत आहेत. याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मावळा मध्ये येऊन कार्यकर्त्यांना महायुतीचे काम करण्याबाबतचे आवाहन करणार आहे. व निश्चितच येथील भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता हा महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी महायुतीच्या पाठीशी उभा राहील हा आम्हाला ठाम विश्वास आहे.

इतर बातम्या