Breaking news

Holi Mahotsav : लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये होळी व धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा

लोणावळा : दुष्ट प्रवृत्ती व अमंगल विचार यांचा नाश करून सत प्रवृत्तीचा मार्ग दाखविणारा सण म्हणजे होळी. हा होळीचा सण लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हुताशमी (होळी) पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र सायंकाळी होळी प्रज्वलित करण्यात आली. याकरिता बच्चे कंपनी व नागरिकांची दुपारपासूनच पळापळ सुरू होती. विविध भागांमधून गवऱ्या व लाकडे गोळा करण्यात आली होती. सायंकाळी होळीची विधिवत पूजा करत गवऱ्या व लाकडे रचत होळी तयार करण्यात आली. रात्री साधारणता सात ते नऊच्या दरम्यान सर्वत्र होळीची पूजा करत ती प्रज्वलित करण्यात आली. होळी प्रज्वलित करण्यापूर्वी होळीचा सण का साजरा केला जातो, याबाबत प्रचलित असलेली कथा उपस्थित असताना सांगण्यात आली. होळी प्रज्वलित झाल्यानंतर महिला, पुरुष, लहान मुले यांनी होळीच्या गोल भवती पाणी टाकत फेऱ्या मारल्या व होळी रे होळी पुरणाची पोळी असा घोषणा दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुले, महिला व पुरुष यामध्ये सहभागी झाले होते. एकमेकाला रंग लावत होळीच्या शुभेच्छा देत उपस्थितांनी नृत्य सादर केले. शहरांमध्ये विविध सोसायटीमध्ये तसेच गावोगावी मंदिरांच्या समोर तसेच मोकळ्या जागांमध्ये धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात आला. लोणावळा शहरातील काही हॉटेलमध्ये या निमित्ताने खास मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

इतर बातम्या