Breaking news

पुणे लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांचा विकास होणार; डीआरयुसीसी च्या बैठकीत विविध मुद्दयावर चर्चा

पिंपरी चिंचवड : प्रवाशांच्या सोईसाठी पुणे लोणावळा दरम्यानच्या अनेक रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे चिंचवड रेल्वे स्थानकावरील नवीन पादचारी पुल पुढील दोन ते तीन महिन्यात प्रवाशांसाठी चालू करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी ईलेट्रिक एलिव्हेटर लावण्यात येणार आहे.

   सर्व रेल्वे स्थानकांवर CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मळवली, कामशेत, कान्हे, वडगाव, घोरावाडी, कासारवाडी आदी ठिकाणी रेल्वे फाटके बंद करुन त्याठिकाणी पुलांचे काम करण्यात येणार आहे. सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नुकतीच DRM कार्यालयात डीआरयुसीसी (विभागीय रेल्वे सल्लागार समीती सदस्य) यांची रेल्वे अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये वरिल विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ईक्बाल मुलाणी यांनी दिली.

    रेल्वे चौपदरीकरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलचे तिकिट देण्यात यावे. पिंपरी चिंचवड, देहुरोड, तळेगांव, या भागात देशातील विविध राज्यांतील नागरिक व व्यावसायिक असल्याने त्या, लोकसंख्याचा विचार करून चिंचवडला काही लांब पल्याच्या गाडयांना थांबे देण्यात यावेत, पॅसेंजर गाड्यांना तिकिट देण्यात यावे, यासह अनेक मागण्या यावेळी सदस्य बशीर सुतार, निखिल काची, शिवनाथ बियानी, दीपाली ताई धानोकर यांनी केल्या. 

    यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा व वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक डाॅ. स्वप्निल नील यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

इतर बातम्या