Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह व जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, लोणावळा येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह (१७ ते २३ सप्टेंबर २०२६) व २५ सप्टेंबर २०२६ रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

        या कार्यक्रमासाठी सिंहगड संकुल, लोणावळ्याचे संचालक डॉ. राजेश लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्राचार्य डॉ. रुखसाना पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. श्रद्धा जगताप यांनी काम पाहिले.

या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फार्माकोव्हिजिलन्स जनजागृती, तज्ज्ञ व्याख्यान, आविष्कार स्पर्धा, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, सोशल मीडिया व रील्स स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, फार्मासिस्ट शपथ, आरोग्य जनजागृती रॅली तसेच पथनाट्य यांचा समावेश होता.

आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची उंची, वजन, BMI, हिमोग्लोबिन व रक्तदाब यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट शपथ घेतल्यानंतर आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली.     

        रॅलीदरम्यान औषधांचा सुरक्षित व योग्य वापर, औषधांच्या दुष्परिणामांची नोंदणी आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमातील पथनाट्य हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, फार्माकोव्हिजिलन्स आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रभावी जनजागृती केली.

या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध स्पर्धा व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. “सुरक्षित औषधे, निरोगी समाज” हा संदेश देत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

इतर बातम्या