Breaking news

लोणावळ्यात अनंत चतुर्दशीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अखंड ३० वर्षांची महाप्रसादाची परंपरा कायम; विविध मंडळांचा होणार सन्मान!

लोणावळा : "निरोप घेता देवा आता आज्ञा असावी... चुकले आमुचे काही त्यासी क्षमा असावी..." या भावपूर्ण वातावरणात अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोणावळा शहर सज्ज झाले आहे. या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, लोणावळा शहर यांच्या वतीने भव्य महाप्रसाद वाटप व गणेशोत्सव मंडळांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील ३० वर्षांपासून कोणतीही खंड न पडू देता ही सामाजिक व धार्मिक परंपरा सातत्याने राबवली जात आहे.

        अनंत चतुर्दशीच्या दिवशी लोणावळ्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ढोल-ताशा पथके, स्थानिक नागरिक तसेच लगतच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. या सर्व गणेशभक्तांसाठी आणि मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांसाठी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

      या उपक्रमाचे व महाप्रसाद वाटपाचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे, मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे, उप-नगराध्यक्ष श्री. देविदास कडू, लोणावळा ग्रामीण उपनिरीक्षक भुषण माने, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक श्री. सचिन पाटील, आणि ग्रामीण पोलिस निरीक्षक श्री. दिनेश तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच शिवसेना लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

      केवळ महाप्रसादच नव्हे, तर विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढवणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा आणि ढोल-ताशा पथकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सदर महाप्रसादाचा व सोहळ्याचा लाभ सर्व लोणावळेकर नागरिक, ग्रामीण भागातील भाविक आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या