Breaking news

गणेश विसर्जन 2026 l लोणावळा शहरात ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या गजरात नऊ तासांच्या दैदिप्यमान मिरवणुकीनंतर लाडक्या गणरायाला निरोप

लोणावळा : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या गजरामध्ये व ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्यांच्या सुरामध्ये नऊ तासांच्या दैदीप्यमान मिरवणुकीनंतर लोणावळा शहरांमध्ये लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. लोणावळा शहरामध्ये गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे व येथील अनंत चतुर्थीच्या दिवशी होणारी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मावळ तालुक्यामधून मोठ्या संख्येने भाविक लोणावळा शहरामध्ये येत असतात. लोणावळा शहरातील मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवुड गणेश मंडळाचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष असल्याकारणाने अतिशय भव्य दिव्य अशी पारंपारिक वाद्यांच्या सुरामध्ये गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मावळा पुतळा चौक या ठिकाणी मानाचा पहिला गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी दाखल झाला. या मिरवणुकीमध्ये तीन वेगवेगळी ढोल पथके, एक वारकरी पथक व मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक असा फुलांचे डेकोरेशन असलेला रथ तयार करण्यात आला होता.

सायंकाळी पाच वाजता मावळा पुतळा चौक येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पुढे जयचंद्र चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ढोल ताशा पथकांचे खेळ सादर करण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज या मानाच्या मुख्य चौकामध्ये मानाचा पहिला गणपती दाखल झाला त्या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशा पथकांचे खेळ सादर करण्यात आले व रात्री नऊ वाजता पुढे गणपती बाप्पा विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाला. त्या पाठोपाठ मानाचा दुसरा तरुण मराठा मंडळ, मानाचा तिसरा रोहिदास तरुण मंडळ, मानाचा चौथा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गवळीवाडा, मानाचा पाचवा शेतकरी भजनी मंडळ वलवन हे गणपती बाप्पा मावळा पुतळा ते जयचंद्र चौक व पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे दाखल झाले. मानाचे हे पाच गणपती मुख्य चौकातून विसर्जन घाटाकडे जाण्याकरिता रात्रीचे 11 वाजले होते. त्यानंतर मानाचे इतर गणपती मुख्य चौकांमध्ये येण्यास सुरुवात झाली. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीच्या रॅलीचे नियोजन काहीसे रेंगळल्यामुळे शेवटच्या गणपती बाप्पांना त्यांचे खेळ सादर करण्यास मुख्य चौकांमध्ये कमी वेळ मिळाला. रात्री अकरानंतर पोलिसांनी देखील धावपळ करत मंडळांना पुढे सरकवण्यास सुरुवात केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेकडून सर्व गणेश मंडळांचे व ढोल ताशा पथकांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व गणेश मंडळांचे व ढोल ताशा पथकांचे स्वागत केले. जयचंद्र चौक या ठिकाणी सालाबाद प्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मागील 30 वर्षापासून अविरतपणे हा महाप्रसाद वाटपाचा उपक्रम लोणावळा शहरात सुरू आहे. शेजारीच शिवसेना पक्ष कडून 11000 लाडू व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले समोरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे व ढोल ताशा पथकांचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्यावतीने सर्व गणेश भक्तांना चहा वाटप करण्यात आला, रामदेव बाबा भक्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे भेळ वाटप करण्यात आली. श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट मावळ वार्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन घाट मार्गावर सर्व गणेश भक्तांना चहा व बिस्किट वाटप करण्यात आले. लोणावळा व्यापारी संघाकडून गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.

लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी विसर्जन मिरवणुकीचे मागील काही दिवसांपासून चोख नियोजन केले होते. सर्व गणेश मंडळांना चौकात येण्याच्या वेळा देखील त्यांनी ठरवून दिल्या होत्या. मात्र मानाचा पहिला गणपती यांचे शताब्दी महोत्सवी वर्ष असल्या कारणामुळे त्यांची मिरवणूक काहीशी रेंगाळत पुढे गेल्यामुळे मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या अंतरासाठी त्यांनी चार तासाचा वेळ घेतला. त्यामुळे मागील मिरवणूक काहीशी उशिराने पुढे सरकत होती रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास मानाचे सर्व गणपती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विसर्जन घाटाकडे विसर्जित झाले व रात्री दोन वाजता सर्व गणपती बाप्पांचे वेगवेगळ्या विसर्जन घाटांवर विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपनगराध्यक्ष देविदास कडू मुख्याधिकारी अशोक साबळे बांधकाम समितीचे सभापती सनी दळवी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका यांनी स्वागत कक्षात उपस्थित राहून सर्व गणेश मंडळांचे व गणेश भक्तांचे स्वागत केले. विसर्जन घाटांवर लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग मित्र यांच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले होते.

इतर बातम्या