आठ दिवसात लोणावळा शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास सर्व मोकाट जनावरे नगर परिषदेच्या पार्किंग मध्ये उभी करणार - माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी
लोणावळा : लोणावळा शहरातील मोकाट जनावरांच्या त्रासामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून या मोकाट जनावरांचा चौका चौकांमध्ये ठिय्या बसत असल्यामुळे वाहतुकीची समस्या देखील वाढत आहे. असे असताना लोणावळा नगर परिषदेचे या समस्या कडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे पुढील आठ दिवसात लोणावळा शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लोणावळा नगरपरिषदेने न केल्यास सर्व मोकाट जनावरे नगर परिषदेच्या पार्किंग मध्ये उभे करून आंदोलन करण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दिला आहे.
माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी म्हणाले लोणावळा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही मोकाट जनावरे चौका चौकात तसेच मुख्य रस्त्यांवर बसत असल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. अनेक वेळा या मोकाट जनावरांमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना दुखापत देखील झाली आहे. मागील काळामध्ये नगरपरिषदेच्या वतीने या मोकाट जनावरांची गोशाळेमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यावेळी शहरामध्ये कोठेही मोकाट जनावर दिसत नव्हते नगरपरिषदेकडून त्याबाबतची योग्य ती तरतूद देखील करण्यात आली होती. आता मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रशासन या सर्वांचेच या मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे शहरात सर्वत्र त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी नगरपरिषदेच्या इमारतीसमोर देखील व मुख्य चौकात देखील मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
लोणावळा बाजारपेठेचा भाग, गवळीवाडा, रायवुड, भांगरवाडी या सर्वच भागामध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. भटक्या कुत्र्यांची देखील संख्या प्रचंड वाढली असून भांगरवाडी मध्ये नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे. सकाळच्या वेळेमध्ये शाळकरी मुले शाळेत जात असतात यावेळेस वेगवेगळ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद होत आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
लोणावळा नगरपरिषदेने या समस्येकडे तातडीने लक्ष देत पुढील आठ दिवसांमध्ये या मोकाट जनावरांची योग्य ती व्यवस्था लावावी अन्यथा रस्त्यावरील ही सर्व मोकाट जनावरे लोणावळा नगर परिषदेच्या इमारतीमध्ये घेऊन जात आंदोलन करण्याचा इशारा माजी उपरागराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दिला आहे.





















