Breaking news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कारकीर्दीनिमित्त लोणावळ्यात भाजपा महिला आघाडीकडून अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान

लोणावळा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर नाने मावळ मंडळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने लोणावळा शहरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 'सेवा सप्ताह' म्हणून साजरा करण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांनी बजावलेल्या मोलाच्या सेवेचा गौरव करण्यात आला.

अंगणवाडी सेविका म्हणजे मुलांच्या दुसऱ्या माता – संजीवनी पांडे

महिला मोर्चा प्रदेश सचिव संजीवनी पांडे यांनी उपक्रमाबाबत सांगताना व्यक्त केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गौरव सोहळा राबविला जात आहे. कष्टकरी कामगारांच्या मुलांना योग्य वळण लावून त्यांच्या जीवनाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करत आहेत. घरात एका मुलाला सांभाळणे कठीण असताना, या सेविका अत्यंत अल्प मोबदल्यात अनेक मुलांना प्रेमाने सांभाळतात. त्या खऱ्या अर्थाने लहान मुलांच्या दुसऱ्या माताच आहेत. या महिलांच्या समस्या प्रत्यक्ष भेटी देऊन जाणून घेतल्या जातील आणि त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल."

अंगणवाडी शाळांमुळेच नगरपरिषद शाळा जिवंत – सुरेखाताई जाधव

माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले, "पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीच्या निमित्ताने अंगणवाडी सेविकांचा सत्कार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आज प्रत्येक अंगणवाडीत बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते आणि हीच मुले पुढे नगरपरिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. खऱ्या अर्थाने अंगणवाडी शाळांमुळेच नगरपरिषदेच्या शाळा जिवंत राहिल्या आहेत. भाजप महिला मोर्चा कायम या सेविकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडविल्या जातील."

       भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सायली बोत्रे यांनीही अंगणवाडी कारभाराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेण्यावर भर दिला. "भारताचे भविष्य घडवणाऱ्या या महिलांचा गौरव करणे हा भाजप महिला मोर्चाचा उद्देश आहे," असे त्या म्हणाल्या.

मानधनवाढ आणि पेन्शनची अंगणवाडी सेविकांची मागणी

या कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांनी आपल्या व्यथा आणि मागण्या मांडल्या. "अंगणवाडी सेविकांमध्ये अनेक महिला या अतिशय गरीब, परितक्त्या किंवा गरजू आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांना खऱ्या अर्थाने सन्मान द्यावा. तसेच सेवापूर्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटीची सोय करावी, जेणेकरून निवृत्तीनंतर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही," अशी भावना सेविकांनी व्यक्त केली.

      या सोहळ्याला भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव संजीवनी पांडे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सायली बोत्रे, लोणावळा शहर नाणे मावळ महिला अध्यक्षा पारिजा भिल्लारे, पुणे जिल्हा सचिव मृदुला भावे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेविका रेश्मा पाठारे, जिल्हा सचिव चारुलता कमलवार, लोणावळा नाणे मावळ मंडल अध्यक्ष अनिल गायकवाड, माजी अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, राजाभाऊ खळदकर, दत्तात्रय तांदळे, गणेश साठे, पांडुरंग तीखे, नंदकुमार जोशी, सुजाता ठुले, पार्वती रावळ यांसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       संतोषी तोंडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भाजपा लोणावळा, नाणे मावळ महिला आघाडीच्या महिलांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.

इतर बातम्या