Breaking news

Lonavala News : लोणावळ्यात स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्त 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

लोणावळा : शंकरबन प्रतिष्ठान कडून सालाबाद प्रमाणे आज (10 एप्रिल) श्री स्वामी समर्थ (ब्रह्मांडनायकाचा) प्रगट दिन सोहळा कार्यक्रम व त्या निमित्ताने 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात सुमित्रा सभागृह भांगरवाडी  लोणावळा येथे पार पडला. लोणावळा शहर व परिसरात हजारो भाविकांनी याठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. 

       श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर बाबा महाराज, श्री चिले बाबा महाराज, श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज, श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी महाराज, श्री श्रीधर स्वामी महाराज, श्री साई गगनगिरी महाराज, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज, श्री बाळूमामा, श्री दत्त गुरु गिरनारी महाराज, श्री सद्गुरू शिवाजी महाराज विडणी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज या विभूतींच्या सिद्ध चरण पादुकांचे दर्शन घेण्याचा लाभ नागरिकांना एकच छताखाली मिळाला. 

           दुपारी बारा वाजता महिला भगिनींच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांची सामुहिक महाआरती व नैवेद्य अर्पण सोहळा संपन्न झाला. तसेच दुपारी 12:00 वाजल्यापासून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

    शंकरबन प्रतिष्ठानच्या वतीने आज सायंकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत सुप्रसिद्ध गायक योगेशजी तपस्वी यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 07:30 ते 09:00 पर्यंत महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. तरी लोणावळ्यातील तमाम नागरिकांनी व भक्त परिवाराने या सार्वजनिक सोहळ्यात सहभागी होऊन पादुका दर्शन सोहळा, कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकरबन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर उर्फ राजू दादा निकम यांनी केले आहे.

इतर बातम्या