Breaking news

प्रगती एक्सप्रेसला चिंचवड येथे थांबा देण्याची प्रवासी संघटनेची आग्रही मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड या शहराची लोकसंख्या 35 ते 40 लाखांहून अधिक आहे. हे शहर मागील काही वर्षांपासून अधिकाधिक विकसित झाले आहे. MIDC मध्ये विविध कंपन्या हजारोंच्या संख्येने आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे IT पार्क तसेच शाळा-काॅलेज आहेत. मेडीकल काॅलेज हाॅस्पिटल्स व शैक्षणिक संस्थांमध्ये परराज्यातील विद्यार्थी तसेच कंपन्यांना कामगार पिंपरी चिंचवड या शहराला प्रथम प्राधान्य देत आहेत. अशा या कामगार आणि विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. या राजधानी जवळ वेगाने प्रगत झालेले व जास्त लोकसंख्या असलेले शहर म्हणजे पिंपरी चिंचवड. या शहरातून हजारो व्यापारी, व्यावसायिक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी व खाजगी कंपन्यांचे कामगार यांना कामानिमित्त मुंबईला रोज यावे-जावे लागते. पिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानकाहून मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या अशा प्रवाशांची संख्या जवळपास बाराशे एवढी आहे. रेल्वे प्रशासनाने गेल्या 3 वर्षात 5 वेळा, पिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानकावरील सकाळच्या वेळेतील गर्दीचे व उपलब्ध गाड्यांचे सर्वेक्षण केले आहे. या स्टेशनवरुन मुंबईला जाण्यासाठी सकाळी 6.35 नंतर थेट साडे नऊ तासांनी म्हणजे संध्याकाळी 4.14 वाजता कोयना एक्सप्रेस आहे. यापूर्वी सहयाद्री एक्सप्रेस होती. आता ती बंद करण्यात आलेली आहे. प्रगती एक्सप्रेसला सकाळच्या वेळेत कनेक्टींग लोकल नाही. प्रगती एक्सप्रेसला येता-जाता चिंचवड येथे थांबा दिल्यास दैनंदिन व इतर प्रवाशांना 100 % सोयीचे होईल, तसेच प्रवाशांच्या संख्येतही वाढ होईल. मुंबईला जाण्यासाठी प्रवासी चिंचवड स्टेशनला लागूनच जवळच हायवे वरुन अधिक रुपये खर्च करुन जातात. कारण, सकाळच्या वेळेत 6.35 नंतर  मुंबईला जाण्यासाठी कोणतीही रेल्वे गाडी नाही. वरील पार्श्वभूमीवर, प्रगती एक्सप्रेसला जाता-येता चिंचवड स्टेशन येथे थांबा द्यावा, अशी आग्रही मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी व पिंपरी चिंचवड (पुणे) संघटनेने मध्य रेल्वेचे मुख्य यात्री परिवहन प्रबंधक  यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इतर बातम्या