Breaking news

Maval Loksabha Election | रडीचा डाव फसला; छाननी मध्ये नाशिकचे संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज झाला बाद


मावळ माझा न्युज नेटवर्क : निवडणूक लढवताना विरोधी प्रतिस्पर्ध्याची मते कशी विभागली जातील याकरिता अनेक डावपेच खेळले जातात. असाच एक डावपेच मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना खेळण्यात आला होता. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी साधर्म असलेल्या नाशिक येथील संजय सुभाष वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आला होता.

नावाशी साधर्म्य असल्याने हे संजय सुभाष वाघेरे कोण? याबाबत मागील दोन दिवस चर्चांना उधाण आले होते. तसेच नाशिक येथील व्यक्ती मावळ लोकसभेसाठी अर्ज भरण्यासाठी कशी आली व त्यांना येथे कोणी आणले याबाबत चर्चा सुरू असताना आज मात्र नामनिर्देशन पत्रांची छाननी करताना काही कागदपत्रांची कमी असल्याने संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरविला आहे. यामुळे मत विभागणीसाठी खेळण्यात आलेला रडीचा डाव फसला असल्याची चर्चा आज मतदारसंघात रंगली आहे. 2014 साली याच मतदारसंघांमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका लक्ष्मण जगताप यांनी असाच उमेदवारी अर्ज भरला होता. 2024 च्या निवडणुकीमध्ये संजोग वाघेरे पाटील व संजय वाघेरे अशा नाव साधर्म्य असलेल्या दोन नावांमुळे दहा वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याविषयी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले, समोर पराभव दिसू लागला की असे रडीचे डाव खेळले जातात. यामागे कोण आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता नाही, डाव रडीचा असल्याने तो सुरू होण्यापूर्वीच मोडून पडला आहे. माझी निवडणूक ही आता माझी राहिली नसून ती जनतेने हाती घेतलेले निवडणूक आहे. त्यामुळे कोणी कितीही डावपेच खेळले तरी मतदार राजा आता भुलणार नाही कारण मतदार संघात लोकांनां विकास करणारा त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार, त्यांचे दुःख व समस्या जाणून घेणारा खासदार हवा आहे असे सांगितले.

      मावळ लोकसभेसाठी 38 जणांनी नाम निर्देशन अर्ज काल अखेर दाखल केले होते आज या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये तीन अर्ज हे बाद करण्यात आले आहेत कागदपत्रांची अपूर्णता, प्रतिज्ञापत्र न जोडणे व डिपॉझिट भरण्यात झालेला विलंब या कारणांमुळे हे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

इतर बातम्या