पोलीस भरती; राज्यात सात हजार पोलिसांची होणार भरती

मुंबई : राज्याच्या पोलिस दलामध्ये लवकरच 7000 पोलिस शिपायांची भरती होणार आहे. जून महिन्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गृह विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली. राज्यमंत्री मंडळाने या भरतीला पूर्वीच मान्यता दिली आहे मात्र कोरोनामुळे ही भरती होऊ शकली नव्हती. या भरतीसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल एकाच वेळी भरती केली जाणार असून भरती प्रक्रियेमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. एक ते दीड महिन्याचा कालावधी मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल पहिल्या टप्प्यामध्ये 5000 पोलिसांची भरती करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी दहा हजार पदे भरण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. यामुळे तरुणांना पोलीस खात्यामध्ये नोकरीची नामी संधी मिळणार आहे.