Breaking news

वसंत व्याख्यानमाला | कारगिल टायगर हिल्सवर 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो, डोळ्यातून - नाकातून रक्त गळत होते, अंगभर गोळ्या होत्या मात्र लढण्याची जिद्द व आत्मविश्वास कायम होता - परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह याद

लोणावळा : कारगिल येथील टायगर हिल्सवर पाकिस्तानी 150 सैन्याच्या विरोधात आम्ही सात जण लढत होतो. वजा 20 तापमान होते, डोळ्यातून - नाकातून रक्त अंगत होते, अंगभर गोळ्या लागल्या होत्या. एक पाऊल पुढे टाकले तरी मृत्यू व एक पाऊल मागे टाकले तरी मृत्यू अशी परिस्थिती होती. मरायचे आहे तर मागे हटून मारण्यापेक्षा वाघासारखे लढून मरु अशी जिद्द मनाशी बाळगत लढलो. पाकिस्तानी सैन्यानी अंगावर उभे राहून गोळ्या झाडल्या, दगड मारले मात्र तोंडातून कसलाही आवाज न करता मी तसाच पडून राहिलो व संधी मिळताच जवळचा हॅण्ड ग्रेड पाकिस्तानी सैन्यावर टाकत अंदाधुंद गोळीबार केला. भारताचे परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव त्यांचे कारगिल युध्दातील अनुभव सांगत असताना ऐकणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. देशासाठी जगण्याची काय ती जिद्द व केवढा तो प्रचंड आत्मविश्वास त्या सैनिकांमध्ये असतो. त्यांच्या नसा नसांमध्ये भरलेले ते देशप्रेम पाहून ते कुठे व आपण कुठे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निश्चितच आल्याशिवाय राहणार नाही.

    निमित्त होते लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेचे. मागील 21 वर्षापासून लोणावळा शहरात सुरू असलेल्या व वक्त्यांची प्रचंड मोठी परंपरा असलेल्या भांगरवाडी येथील वसंत व्याख्यानमालेतील पहिले पुष्प परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव यांनी गुंफले. निगडी येथील सी अँड स्काउट्स कॅडेड्स बँड पथकाने त्यांचे स्वागत केले. परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने व्याख्यानमालेला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षा चित्रा जोशी, समितीच्या अध्यक्षा राधिका भोंडे, कल्पना चावला स्पेस अकादमीचे संचालक संजय पुजारी, वसंत व्याख्यानमाला समितीचे संजय गायकवाड, प्रशांत पुराणिक, स्मिता कूछल हे उपस्थित होते. यावेळी प्रिया मेहता व प्रा. चिन्मय यांनी ए वतन तेरे लिये हे गीत सादर केले.  

     आपले अनुभव कथन करण्यास सुरुवात करण्यापूर्वी परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव महणाले, आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत उभा आहे. ही पावन भूमी, जप, तप, वीरांची, संतांची भूमी आहे. उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, युवकांनो जीवनाचा उद्देश माहिती पडला की जीवन सुकर होते. मात्र आज युवकांना आपला उद्देश काय आहे हेच समजत नाही. आपण काय करतोय हेच माहीत नाही, कोणीतरी सांगितलय म्हणून काहीतरी करतोय अशी उत्तरे मिळतात. तुम्ही आयुष्यात (Perpose (उद्देश), passion (आवड), performance (कामगिरी) हे तीन पी कायम ध्यानात ठेवा. यासाठी आपल्या जीवनात कोणीतरी आदर्श असायला पाहिजे. 

     सैनिक देशाचा विश्वास असतो. तो प्रशिक्षण घेताना आगीत जळून तयार झालेला तप्त गोळा असतो. 140 करोड जनतेचा विश्वास असतो. प्रत्येक जण स्वप्न बघतात. सैनिक स्वप्न बघतात व ते पूर्ण करण्यासाठी जगतात. वेळ ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ती एकदा गेली की गेली पुन्हा भेटत नाही. देशाच्या विकासासाठी देशात शांती फार महत्वाची आहे. याकरिता देशाचे सैन्य दल मजबूत असणे गरजेचे आहे. वेळेचा सदुपयोग करा व चांगल्या पोस्ट वर जा तुम्हाला रील करायची गरज पडणार नाही. देश तुमची रिल बनवतील. हिमालयात बॉर्डर वर वजा 60 डिग्री तापमानात सैनिक दिवस रात्र काम करतात. म्हणून आपण देशात सुरक्षित जीवन जगत आहे. त्या विर जवानांचे कायम स्मरण करा. 

       कोणतेही काम हे माहितीच्या आधारे नियोजन करून केले जाते. कारगिल मध्ये  हल्ला झाला तेव्हा मात्र कोणतेही नियोजन करण्यासाठी वेळ नव्हता. वजा 20 डिग्री तापमानात 13000 ते 18000 फूट उंचीवर कोणतेही नियोजन नसतात ही लढाई लढली गेली आहे. तोरोलिंग पहाडावर 22 दिवस पहिले युद्ध लढले गेले. 12 जून 99 रोजी तो पहिला विजय मिळवला. त्यानंतर दुसरा टास्क आम्हाला मिळाला, तो टायगर हिल्स 17000 फूट उंच जिंकायचा होता. विशेष टीम कमांडो टीम तयार केली गेली. नवीन व जुने साथीदार त्यामध्ये होते. व्यक्तीची ओळख कामातून होत असते. पहिल्या लढाईत 22 दिवस आम्ही 3 जवान लढाई करणाऱ्या जवानांना अन्न धान्य पुरवित होतो. त्यामधून आम्हाला पुढे काम करण्याची संधी मिळाली. ते 22 दिवस व रात्र आम्ही फक्त चालत होतो. आपल्या मनात जो गैरसमज आहे की सैनिक मरण्यासाठी असतात. तो काढून टाका कारण सैनिक मरण्यासाठी नाही तर मारण्यासाठी व वाचविण्यासाठी असतात हे कायम ध्यानात ठेवा.

     17000 फूट उंचीच्या टायगर हिल्स वर 2 रात्र व 1 दिवस आम्ही चढाई करत होतो. डोळ्यातून रक्त गळत होते मात्र या सर्व परिस्थितीत मात करत टायगर टॉप वर पोहचलो. दोर बांधून चढलो. कारण दुश्मन सैन्याना समजले नाही पाहिजे. आमच्यापैकी फक्त 7 जवान वर चढले व बेछूट गोळीबार केला व पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केला. त्यानंतर पुन्हा 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो. एक पाऊल पुढे किंवा मागे टाकले तरी मरण होते. अशा स्थितीत लढलो व पुढे पाऊल टाकत राहिलो. एक दिवस मारायचे आहे मग कायर म्हणून मारण्यापेक्षा वाघासारखे लढून मरू. आम्ही तिन्ही बाजूने घेरलो होतो. 5 तास लढत होतो. जे तुम्ही सिनेमात बघता ते आम्ही प्रत्यक्ष जगलोय. माझ्यावर उपचार करणारा जवान त्यांच्या डोक्यातून गोळी लागली तरी आवाज केला नाही. चारी बाजूने रक्ताचे पाट वाहत होते. डोक्यावर डोकं नव्हत पण हातातील बंदूक सुटली नव्हती. माझ्या सोबतचे जवान मरून पडले होते मी देखील मरून पडल्यासारखे होतो. मला देखील पाकिस्तानी सैन्यानी गोळ्या मारल्या तरी देखील आम्ही तसेच पडून राहिलो. अमानुषपणे आमच्यावर दगड मारले, बूट मारले तरी देखील आम्ही सहन करत राहिलो. देवावर विश्वास होता. त्यांना समर्पित भावाने आवाज दिला. त्यांनी मला जिंवत ठेवले. फक्त डोक्यात व छातीत गोळी नाही मारली तर मी जिवंत राहील असा मनात संकल्प केला. त्यांनी पुन्हा गोळ्या मारल्या मात्र यत्किंचितही आवाज केला नाही. भारत मातेने त्यावेळी मला माध्यम निवडले व मी जिवंत राहिलो. काही गोळ्या खिशातील पाच रुपयांच्या डॉलरला लागल्या. आमची हत्यारे काढून घेतली. एक हॅण्ड ग्रेड होतो तो मी फेकला तेव्हा पाकिस्तान जवानांना वाटले यांच्यामधील कोणी जिवंत आहे की नवीन टीम आली ते त्यांना समजे पर्यंत मी एका रायफल ने फायरींग केली. त्यामुळे नवीन टीम आल्याचा समज करत पाकिस्तानी सैनिक सर्व साहित्य व हत्यारे सोडून पळून गेले. मी पुन्हा माझ्या शहीद झालेल्या जवानांकडे आलो व त्यांनां कवटाळून रडलो पण कोणीही उठले नाही. 19 वर्षांचा मी माझी फक्त 2 वर्षांची सर्व्हिस झाली होती. भारत कुठे आहे व पाकिस्तान कोठे आहे हे देखील कळत नव्हते, सगळीकडे बर्फ होता. 

    तेव्हा मी मनापासून रडलो, कारण म्हणतात ना की मनापासून रडले की मन हलके होते. एवढ्या गोळ्या अंगावर घेऊन मी जिवंत राहिलो हे केवळ काय घडलं होतं हे सांगण्यासाठी चे माध्यम आहे. त्याच परिस्थितीत 500 मिटर गडगडत खाली आलो. वर काय झाले ते तेथील वरिष्ठांना सांगितले. 72 तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता मात्र भूक देखील लागली नव्हती. तीन दिवस श्रीनगर रुग्णालयात पडून होतो. त्याच दिवशी पुन्हा टायगर हिल्स वर भारतीय सैन्य दलाच्या दुसऱ्या टीमने हल्ला केला व विजय प्राप्त केला. तो दिवस आपण आजही कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो.

     आज या देशात 65 टक्के युवा आहे मात्र या युवकांना सूर्य किती वाजता उगवतो हेच कळत नाही हे आपले दुर्दैव आहे. कारण रात्री उशिरापर्यंत रात्र जगवायची व सकाळी उशिरा उठायचे हे आजचे तरुण वागत आहेत. मात्र सैन्य दलात काम करणारे व सैन्य दलात येण्याचे स्वप्न पाहणारे याचा दिवस पहाटे साडेतीन चार वाजता उगवतो. ध्येपूर्तीसाठी धावत असताना आजूबाजूच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा मोलाचा सल्ला यावेळी योगेंद्र सिंह यादव यांनी दिला.

     या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन सरोज कुंभार यांनी केले. वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा राधिका भोंडे यांनी प्रास्ताविक करत व्याख्यानमालेचे पार्श्वभूमी विशद केली तर मान्यवरांच्या परिचय भाग्यश्री पाटील यांनी करून दिला.



इतर बातम्या