Breaking news

ब्राह्मण सभा खोपोली येथे सर्प विषयक चर्चासत्राचे आयोजन

खोपोली (प्रतिनिधी) : साप दिसला की भल्या भल्यांची बोबडी वळते. साप कोणताही असो मग तो विषारीच असेल असे वाटून माणूस त्याच्यापासून चार हात दूर राहतो. साप हा माणसाचा मित्र आहे पर्यावरणाच्या अन्न साखळीतील एक अविभाज्य घटक आहे अशा सर्व बाबींची फक्त चर्चा आणि पुस्तकी प्रचार होतो. याच बाबीचे गांभीर्य ओळखून साप या पर्यावरणातील अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशा सरपटणाऱ्या प्राण्याविषयी जनसामान्यांच्या मनामधे असलेले गैरसमज, शंका - कुशंका आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ब्राह्मण सभा खोपोली यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून चर्चा सत्रातून प्रबोधनाचा संकल्प सिद्धीस नेला.

     सर्पमित्र नवीन मोरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्प विषयक विस्तृत अशी माहिती दिली. साप दिसला तर काय करायचे, साप चावला तर काय करायचे, सापाचे संवर्धन कसे करायचे इत्यादी विषयाचे मार्गदर्शन केले.  प्रविण तावडे, योगेश शिंदे, सुनील पुरी, चेतन चौधरी यांनी सर्प पकडण्याच्या साधनांची आणि उपकरणांची माहिती देऊन प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला. सापा विषयी मनात असलेली दहशत व्यक्त करताना खोपोलीतील सर्व मित्रांचे सापाला वाचविण्यासाठीचे  काम कौतुकास्पद असल्याचे शिरीष पवार यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या हस्ते सर्व सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला. खोपोली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल रानडे उपाध्यक्ष सौ पाटणकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते, संस्थेच्या सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.  सर्प मित्रांशी चर्चा करून  आपल्या शंकांचे निरसनही करुन घेतले. कार्यक्रम ठिकाणी सर्पाची विस्तृत माहिती दर्शवणारे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

इतर बातम्या