Breaking news

Manoj Jarange Patil : सगे सोयर्‍यांचा अध्यादेश आज रात्रीच काढा; 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना मोफत शिक्षण द्या - मनोज जरांगे पाटील

मावळ माझा न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील ज्या 57 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सग्या सोयऱ्यांना या नोंदीच्या आधारे आरक्षण देण्याचा अध्यादेश आज रात्रीच काढा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव आज वाशी येथील एपीएमसी मार्केटच्या मैदानावर थांबले आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे व मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी मंगेश चिवटे यांच्या पथकाने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत शासनाचे काही जीआर व कागदपत्रे दाखवत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोहोचत नाही तसा अध्यादेश शासन काढत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

        शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले महाराष्ट्रात कुणबी नोंदी सापडलेल्या 57 लाख नागरिकांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप सुरू करा. ज्यांना प्रमाणपत्र हवे आहे त्यांनी देखील अर्ज करणे गरजेचे आहे. सापडलेल्या नोंदींची यादी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर प्रसिद्ध करा. सध्या क्युरिटी पिटीशन सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्या पिटीशनच्या आधारे मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाजातील सर्व मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत द्या. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शासकीय भरती करू नये व करायची असल्यास आमच्या जागा राखीव ठेवून ती करावी. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या. ज्या 57 लाख नागरिकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सर्व सगेसोयरे यांना शपथपत्राच्या आधारे आरक्षण देण्याचा जीआर काढा, शंभर रुपयाचा स्टॅम्प मोफत उपलब्ध करून द्या अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून या सर्व गोष्टींचा जीआर आज रात्रीच काढून उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जीआर आमच्या हातात द्या. अन्यथा बारा वाजता आम्ही आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय जाहीर करू व एकदा आझाद मैदानाकडे निघाल्यावर आम्ही थांबणार नाही असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला दिला आहे.

       आम्हाला मुंबईत येण्याची हाऊस नव्हती. अंतरवाली सराटी या ठिकाणीच आपण आरक्षण दिले असते तर आम्ही येथे आलो नसतो. आज मराठा समाजातील लाखो मुले पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी व हक्काचे आरक्षण मागण्यासाठी मुंबईकरांच्या दारात आली आहेत. मुंबईकरांनी देखील आमच्या मराठा समाजातील मुलांना तहान लागली तर तांब्यावरून पाणी द्यावे. महाराष्ट्र शासनाने व पोलिसांनी आमच्या मुलांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील तमाम समाज मुंबईमध्ये दाखल होऊन मुंबईची तुंबापुरी करून सोडू. आमचे शांततेमध्ये आंदोलन सुरू आहे. मुंबईतील समाज हा देखील आमचा आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही यांची सर्वतोपरी काळजी या ठिकाणी उपस्थित असलेला मराठा समाज घेत आहे. कोणालाही त्रास देण्याची आमची भूमिका नाही मात्र मायबाप सरकार यांनी देखील त्यांची भूमिका पार पाडत मुंबईकरांना व मराठा समाजाला त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. आम्हाला आरक्षण हवं आहे. मग ते तुम्ही कोठेही द्या वाशीमध्ये द्या, आझाद मैदानावर द्या किंवा अंतरवाली सराटीमध्ये द्या, आम्ही ते घ्यायला तयार आहोत. मात्र जोपर्यंत मराठा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आरक्षणाची मागणी मागे घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला दिला आहे. आम्ही आरक्षण घेण्यासाठी येथे आलो आहे, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. आम्ही कोठेही आझाद मैदानावर जाणार नाही असे म्हटलेलो नाही. आजाद मैदानावर आम्ही जाणारच आहोत. जीआर दिला तर विजय साजरा करायला जाऊ, नाही दिला तर आमरण उपोषण करायला जाऊ. आम्हाला तेथे घरे बांधायची नाहीत, आम्हाला आमची हक्काची मागणी मान्य करून घ्यायची आहे. आमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याकरिता आम्ही एवढ्या लांब आलो आहोत. आत्ता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठा समाज एकमेकांवर माया करणारा समाज आहे, कोणालाही त्रास देण्याची आमची भूमिका नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत. शासनाने देखील आपली भूमिका सकारात्मक ठेवावी. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर जीआर काढत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात तसेच अंतरवाली सराटी सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील मुलांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते सगळे गुन्हे मागे घेण्याचा अध्यादेश देखील काढा. केवळ आमचे प्रयत्न सुरू आहेत असे म्हणू नका असे स्पष्ट शब्दात जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला सुनावले आहे. 26 जानेवारी चा आदर करत आम्ही आजची रात्र वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काढत आहोत मात्र उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्हाला आमच्या सर्व मागण्यांबाबतचा जीआर मिळाला नाही तर मात्र दुपारी बारा वाजता समाजासोबत चर्चा करत आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत असे स्पष्ट संकेत मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला दिले आहेत.

इतर बातम्या