Breaking news

रमजान ईद व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधत संजोग वाघेरे यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी व केले सहकार्याचे आवाहन

मावळ माझा न्युज : मावळ लोकसभा मतदार संघातील महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी रमजान ईद व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत मावळ लोकसभा मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मागील काही दिवसांपासून वाघेरे यांनी मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा व त्यांच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. रमजान ईद निमित्त लोकसभा मतदार संघातील मस्जिद मध्ये जाऊन मुस्लिम बांधवांच्या भेटी घेत त्यांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या भावना व समस्या समजावून घेत येत्या काळात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मुस्लिम समाजाने देखील वाघेरे यांचे चांगले स्वागत करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती देखील काल झाली. यानिमित्त नागरिकांच्या गाठीभेटी घेत संजोग वाघेरे यांनी त्यांना देखील या लोकसभा निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विविध गावाच्या जत्रा व स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने लोणावळा व तळेगाव भेटी दिल्या होत्या. 

     संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड चे माजी महापौर आहेत. मागील दोन लोकसभा निवडणुकीत ते इच्छुक होते मात्र पक्ष आदेश पळत त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे काम केले. त्यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम करत असताना वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघ अनेक वेळा पिंजून काढला आहे. यावर्षी ते स्वतः लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर विशेष भर दिला आहे. महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील प्रचारात सहभाग घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी देखील वाघेरे यांना विजयी करा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील पिंपरी चिंचवड येथे संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. 

    18 एप्रिल पासून मावळ लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. आज मितीला मावळात महायुती विरुध्द महा विकास आघाडी अशी लढत होण्याची चिन्ह आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात असतील याबाबत स्पष्टता होणार आहे. महायुतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील मतदार संघात गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. मात्र जागोजागी मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागतो आहे.

इतर बातम्या