Lonavala Ganesh Festival : नांगरगावात तिरंगा मित्र मंडळाच्या बाप्पांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत प्राण प्रतिष्ठापना

लोणावळा : नांगरगाव येथील तिरंगा मित्र मंडळाच्या गणपती बाप्पांची दत्त मंदिरापासून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे हे 25 वे वर्ष आहे. 1999 साली नांगरगाव येथे तिरंगा मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाचे मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, मंडळाचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून मंडळाचे कार्यकर्ते गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करत होते. बाप्पांच्या स्वागतासाठी तसेच गणेश भक्तांच्या स्वागतासाठी नांगरगावात दोन्ही बाजूला स्वागत कमानी लावण्यात आल्या असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने येत्या शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच लोणावळा नगर परिषदेच्या सफाई कामगारांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता बाप्पांच्या समोर चक्रीभजन होणार आहे. यावर्षी मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्या कारणाने विसर्जन मिरवणुकीचा सोहळा देखील भव्य स्वरूपामध्ये करण्यात येणार आहे. लोणावळा, नांगरगाव व परिसरातील नागरिकांनी बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे.