Breaking news

PM Narendra Modi l नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

मावळ माझा न्युज नेटवर्क : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या पंतप्रधान पदाची आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात 8 हजार मान्यवरांच्या उपस्थिमध्ये हा दैदिप्यमान सोहळा पार पडला. या शपथ विधी सोहळ्यासाठी विविध देशांचे प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली. भारताच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांच्या समवेत आज 71 खासदारांनी कॅबिनेट व राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आदींनी मंत्री पदाची शपथ घेतली.

    मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूॅं की… असे म्हणताच एकच जल्लोष झाला होता. नरेंद्र मोदी यांनी 2001 ते 2014 दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषविले व त्यानंतर सलग तीन वेळा म्हणजेच 2014, 2019 व 2024 देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.

    या सोहळ्यासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, माॅरिशेसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, बांगलादेश च्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सच्या उपराष्ट्रपती अहमद अफिफ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्या सह भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंद्राचे चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

     नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रीमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांच्या समावेश आहे. या मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी, 5 अल्पसंख्याक मंत्री असणार आहेत. शपथ विधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मोठी खबरदारी घेण्यात आली होती.

     महाराष्ट्रासह देशभरात मोदी यांच्या शपथ विधीचा फटाक्यांची आतषबाजी करत व मिठाई वाटप आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

    

इतर बातम्या