Maval News : बबनराव भेगडे यांनी दिला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आज त्यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. संघटात्मक बदलाच्या नियमानुसार नविन कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरिता स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे भेगडे यांनी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारठकर यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे.
राजीनामा पत्रात बबनराव भेगडे म्हणतात, मी गेली 40 वर्ष देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे नेतृत्वाने समाजवादी कॉंग्रेस, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेसाठी कार्य करीत आहे. गेली 4 वेळा एकूण 13 वर्षे मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून निष्ठेने प्रामाणिकपणे पक्ष संघटना टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी पक्षाचा आमदार नसतानाही अध्यक्ष पदावर काम करत असताना संघटनेतील सर्व घटकांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. तालुक्याचे नेते मदन बाफना, कृष्णराव भेगडे, माऊली दाभाडे व तालुक्यातील अनेक ज्येष्ठ, तरूण, महिला कार्यकर्ते यांनी मला सर्वोतोपरी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यामुळे मी संघटनेचे काम उत्तम प्रकारे करू शकलो. सर्वांशी कायम सुसंवाद ठेवत राहिलो तसेच कार्यकर्त्यांच्या शासकीय पातळीवरील अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. पक्षाने मला सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष पद, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी काम करण्याची संधी दिली.
सध्या मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला भरभराटीचे दिवस आलेले असून सन 2019 च्या निवडणुकीमध्ये पक्षाचे आमदार सुनिल अण्णा शेळके भरघोस मतांनी निवडून आले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनापासून एकोप्याने काम केले व पक्षाला विजय मिळवून दिला. याचा मला अभिमान आहे. निवडणूक आयोगाचे नियमानुसार सहा महिन्यापूर्वी पक्षांतर्गत निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही पक्षांतर्गत निवडणुका होऊ
शकल्या नाहीत. तसेच स्थानिक स्वराज संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका सहा महिने पुढे लांबलेल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत.
तरी नवीन कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कार्य करण्याची संधी मिळावी म्हणून मी स्व:खुशीने माझा अध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा देत आहे. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी पूर्वीच्या जोमाने पक्षाचा एकनिष्ठ सैनिक या नात्याने अखंड कार्य करीत राहील असे म्हंटले आहे.