स्मृतीगंधाने भारलेला निरोप समारंभ; सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस येथे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

कामशेत : सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस अँड फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, कामशेत येथे अंतिम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनाचा निरोप घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे प्रा. डॉ. रामदास बिरादार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. जयवंत बापूजी संकपाळ होते. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र बाबर, संगणक विभाग प्रमुख डॉ. अमृता सुराणा, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सातपुते, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. गौरव भोसेकर, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. प्रवीण थोरात, संगणक विज्ञान व डेटा विज्ञान विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कुदंडे, तसेच इतर प्राध्यापक व समारंभ समन्वयक प्रा. हर्षाली बोडखे आणि प्रा. भाग्यश्री पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. संकपाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत सांगितले, “या संस्थेतील तुमचा प्रवास अमूल्य होता. येथे मिळालेलं ज्ञान आणि अनुभव तुमच्या पुढील आयुष्यात मार्गदर्शक ठरेल.” प्रमुख पाहुणे डॉ. बिरादार यांनी विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कार्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. बाबर यांनी संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कॉलेजमधील संस्मरणीय क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रीच्या आठवणी शेअर करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणे, विनोदी नाटिका, आणि खेळ यांनी वातावरणात उत्साह संचारला. समारंभाच्या शेवटी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. हा निरोप समारंभ हसत-हसत आणि डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत आठवणींनी भरलेला होता. विद्यार्थी नवीन पर्व सुरू करताना शिक्षक आणि मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भावी वाटचालीसाठी सज्ज झाले.