Lonavala Rural Police l लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर

लोणावळा: लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्यावतीने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे. लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवावा, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी त्वरित संपर्क साधता येईल, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.
हेल्पलाइन नंबर: 9146032971
हा मोबाईल क्रमांक पर्यटकांसाठी २४ तास सुरू असणारा हेल्पलाइन नंबर म्हणून घोषित करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात लायन्स पॉईंट, पवना धरण परिसर, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, कार्ला लेणी आणि एकविरा देवी मंदिर अशा अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. काही भाग डोंगराळ व खोल दऱ्यांचा असल्याने अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता असते.
अशा वेळी तात्काळ मदतीसाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधता यावा, यासाठी हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. पर्यटकांसह पर्यटनस्थळांजवळ व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांनीही हा नंबर जतन करून ठेवावा, अशी सूचना ग्रामीण पोलिसांनी केली आहे.