मराठ्यांच्या भगव्या वादळापुढे महाराष्ट्र सरकार झुकलं ! मनोज जारंगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य; सगे सोयर्यांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

मावळ माझा न्यूज नेटवर्क : मराठ्यांच्या भगव्या वादळापुढे अखेर महाराष्ट्र सरकार झुकलं आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या असून तसा अध्यादेश काढण्यात आला आहे. पहाटे चार वाजता सदरचा अध्यादेश मान्य करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ज्या 57 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार तसेच त्या सर्वांना व त्यांचे सगे सोयरे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची महत्त्वाची मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली आहे. शपथ पत्र मोफत उपलब्ध करून देण्यात येणार. जोपर्यंत क्युरिटी पिटीशन चा निकाल लागत नाही व मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील मुलांना मोफत शिक्षण देणे. अंतरवाली सरटीसह महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे. यादेखील मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या असून या सर्व मागण्यांचा अध्यादेश काढण्यात आला आहे. दहा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या हातामध्ये अध्यादेशाची प्रत देणारा असून त्यांचे कालपासून सुरू झालेले आमरण उपोषण सोडवणार आहेत. अध्यादेश समाजाला दाखवला त्यांनी संमती दिल्यानंतर अध्यादेश स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय आहे. या विजयाचे श्रेय माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक सकल मराठा समाजाचे असल्याचे उद्गार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी काढले.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसह ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना व त्यांचे सगे सोयरे असलेल्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रा सुरू केली होती. त्यांना सकल मराठा समाजाचा मोठा पाठिंबा लाभत असल्याने लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाला होता. 30 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा, नजर जाईल तिथपर्यंत फक्त भगवे वादळ असे चित्र या महाराष्ट्राने पाहिले. कित्येक लाख मराठा बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले होते. मराठ्यांचे हे भगवे वादळ मुंबईमध्ये पोचले तर मुंबईचे जनजीवन विस्कळीत होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. सुरुवातीला हा ना हा ना करणारे महाराष्ट्र शासन अखेर मराठ्यांच्या या भगव्या वादळापुढे व मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे झुकले आहे. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने अखेर शासनाला त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या हा मराठ्यांच्या इतिहासामध्ये लिहिला जाणारा सुवर्णक्षण म्हणावा लागेल.