Breaking news

Lonavala Big News : जुलै 2023 पर्यत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पुर्ण होईल - रेल्वे प्रशासन

लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्वाच्या असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम येत्या जुलै 2023 पर्यत पुर्ण होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता सचिन मुंगसे पाटील यांनी दिली. आजपासून रेल्वे कडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य कैलास वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज लोणावळा नगरपरिषदेमध्ये रेल्वे विभागाशी संबंधित विविध मुद्दयांवर नागरिकांची चर्चा झाली. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या प्रयत्नांमुळे कैलास वर्मा यांनी आज लोणावळा रेल्वे स्थानकाला भेट दिली तसेच भांगरवाडी रेल्वे गेट व उड्डाणपुल कामाची पाहणी केली. यानंतर लोणावळा नगरपरिषद कार्यालयात जनतेशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासन पंडीत पाटील, माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, अर्जुन पाठारे, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, लोणावळा नगरपरिषदेच्या बांधकाम अभियंता वैशालि मठपती, रेल्वेचे कार्यकारी अभियंता अजय महारा यांच्यासह शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, नांगरगाव औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना कैलास वर्मा म्हणाले केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व रेल्वे फाटके बंद करत मार्च 2023 पर्यत रेल्वे गेटच्या जागेवर उड्डाणपुल व भुयारी पुल बांधण्याचा मानस आहे. गती शक्ती उपक्रमान्वये ही कामे करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर लोणावळ्यातील उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल. लोणावळा रेल्वे स्थानकाची उंची देखील कमी असल्याने ती वाढविण्यासाठी रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा करणार, कर्जत लोणावळा दरम्यान एक मेमो गाडी सुरु करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या कोविड पासून बंद करण्यात आल्या आहेत. त्या गाड्यांचा थांबा पुन्हा पुर्ववत करावा अशी सर्वांनी एकमुखी मागणी केली. लोणावळा ते पुणे लोकलच्या फेर्‍या वाढवा, रेल्वे स्थानकावर सिसीटिव्ही कॅमेरे वाढवा, खंडाळा रेल्वे स्थानकावरी बंद केलेले तिकिटघर पुन्हा सुरु करा, मुंबईकडून येताना खंडाळा रेल्वे स्थानकावर पुर्वी थांबणार्‍या गाड्या आता थांबत नाही, त्यांचा थांबा पुन्हा सुरु करा, रेल्वे स्थानकाच्या परिसरात सुरक्षेकरिता सुरक्षा भिंत अथवा कंम्पाउंड, रेल्वे काॅलनी भागातील रस्ते व स्वच्छता ही कामे योग्य प्रकारे करून घ्या अशा विविध मागण्या सर्वांनी केल्या. रेल्वे स्थानकावर हाॅकर्स म्हणून काम करणार्‍या स्थानिकांना अधिकृतपणे व्यावसाय करण्याची परवानगी द्या अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वरील सर्व मागण्यांसाठी वर्मा यांना निवेदन देखील देण्यात आले. बैठकीनंतर रेल्वे स्थानक व परिसरातील सुरक्षेबाबत कैलास वर्मा यांनी रेल्वे आरपीएफ चे पोलीस अधिकारी अे.के. जाटव यांच्याशी चर्चा करत सूचना दिल्या. तसेच लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांबाबत रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी व रेल्वे बोर्डात चर्चा करून लोणावळा रेल्वे स्थानकाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. रेल्वे ही नागरिकांना सेवा, सुविधा देणारी असल्याने येथील बंद केलेला थांबा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, लोकलच्या फेर्‍या वाढविण्यासाठी प्रयत्न तसेच रेल टेल मधून सिसीटिव्हीचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिले.

इतर बातम्या