Breaking news

पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बदमाश व्यवस्थेच्या विरोधात लढायच्या आहेत - नाना पटोले

लोणावळा : पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बदमाश व्यवस्थेच्या विरोधात लढायच्या आहेत अशी टिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाआघाडीतील मित्र पक्षावर केली आहे. पुणे जिल्हा हा पुन्हा काँग्रेसमय करण्याचा संकल्प त्यांनी लोणावळ्यात प्रमुख पदाधिकार्‍य‍ांच्या बैठकीत व्यक्त केला.

   लोणावळा शहर काँग्रेसचे नुतन अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व ब्लाॅक अध्यक्ष यांना नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले.

    नाना पटोले म्हणाले मी स्वबळाचा नारा दिला तर सर्वांच्या पोटात गोळा आला. आता काल मुख्यमंत्री शिवसेना म्हणून कामाला लागा हे सांगतात, तेव्हा सर्वांना गोड वाटतंय. महाराष्ट्र काँग्रेसमय करण्याचा माझा मानस आहे. पण मला ही व्यवस्था सुखाने जगू देणार नाही. माझे फोन टॅप केले जातात. मी कोठे जातोय, काय बोलतोय याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आयबीकडून दिला जातो. काँग्रेस मोठी होतीये ते त्यांना खपत नाही. त्याकरिता सोबत राहून पाठित खंजिर खुपसणार्‍यांना ताकतीने उत्तर द्यायचे आहे. त्रासाला ताकद बनवा, आत्मविश्वासाने पुढे जा, संघटना बांधणीवर भर द्या, 2024 ला काँग्रेसच महाराष्ट्रात येणार हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढताना ही बदमाश व्यवस्थेच्या विरोधात लढायची आहे. असे सांगताना नाना पटोले म्हणाले मी पुणे जिल्ह्यात आलोय हे समजल्याने येथील मोठ्या जहाजांना त्रास होणार. पण दुश्मनाला मारायचे असेल तर त्याच्या घरात जाऊनच मारायला हवंय, तशी व्यवस्था तयार करायची आहे. बारामतीची काही लोकं भेटली, त्यांच्याही मनात व्यवस्थेविरोधात उद्रेक आहे. लहान जहाजं इकडे तिकडे करत तरतात पण मोठ्या जहाजांना बुडण्याचा जास्त धोका असतो. भंडारा, नागपुरात तशी व्यवस्था केली आहे आता पुणे जिल्ह्यात तशी व्यवस्था राबवत जिल्हा पुन्हा काँग्रेसमय करायचा आहे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे पवारांवर टिका करण्यात आली. पुढे नाना म्हणाले महाराष्ट्रात दबावाचे व प्रलोभनाचे राजकारण चालत नाही. व कोणी केले तर ते फार काळ टिकत नाही. याकरिता आता दुश्मनाकडे जास्त लक्ष न देता, आपली ताकद वाढविण्यावर भर द्या. बुथ कमिट्या सक्षम करा, आपल्या नेत्यांचे विचार व विचारधारा जनसामान्यांपर्यत पोहचवा. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना यामुळे देशाचे किती नुकसान झाले आहे, सर्वसामान्य करा उध्वस्त झाला आहे हे लोकांना पटवून द्या. काँग्रेसने आजपर्यत काय केलं हे सांगण्यात आपण कमी पडलो हे मान्य करावेच लागेल. मात्र यापुढील काळात नेत्यांची विचारधारा लोकांपर्यत पोहचवा. राहुल गांधी यांचे नेतृत्व आता लोक मान्य करू लागले आहेत. त्यांनी नोटाबंदी, जीएसटी व कोरोना काळात घेतलेली भुमिका लोकांना पटू लागली आहे. समाज त्यांच्याकडे आशेने पहात असताना आपण यामध्ये मागे न राहता पक्षा बळकट करण्यासाठी अहोरात्र काम करायला हवंय. आपल्या हातात तीन वर्ष आहेत. कार्यकर्त्यांवर कोठेही अन्याय होणारा नाही याची व्यवस्था आम्ही करू. पक्ष असा बळकट करू की 2024 ला सत्ता आल्यानंतर काँग्रेसला लवकर कोणी हालवू शकनार नाही.

   पुणे जिल्हा हा काँग्रेसचा जिल्हा आहे. आपण भाव हिस्से करत गेलो, जागा सोडत गेलो पण आता गेलेलं पुन्हा मिळवायचं आहे. याकरिता संघटनात्मक ताकद वाढवा, तरुणांचा ओघ पक्षात वाढत आहे, याचा अर्थ आपली वाटचाल विजयाकडे सुरू आहे. याची सुरुवात आपण लोणावळ्यातून करूयात असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

    यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, महा. प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी अध्यक्ष देविदास भन्साळी, सत्यशिल शेरकर, महेशबापू ढमढेरे, संग्राम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, सोमनाथ दौंडकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, नारायण आंबेकर, बाळासाहेब ढोरे, नुतन लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, महा. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर, वडगाव नगराध्यक्ष मयुर ढोरे, पुजा गायकवाड, सुधिर शिर्के, सुर्वणा अकोलकर, पुष्पा भोकसे, सिंधू कविश्वर, निलम कडू, रवी सलोजा, किरण गायकवाड, राजु गवळी, दिलीप लोंढे, दत्ता दळवी, सुनिल मोगरे, फिरोज बागवान, नासिर शेख, जाकिर शेख, फकिर गवळी, शुभम जोशी, मंगेश बालगुडे, रेखा गवळी, संजय तळेकर, शिवराज मावकर, निखिल तिकोने आदींसह लोणावळा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इतर बातम्या