Breaking news

गणेशोत्सवात योगदान देणाऱ्यांचा खोपोली नगर पालिका प्रशासनाने केला गौरव

खोपोली : खोपोली नगर परिषद हद्दीतील वर्ष 2021 च्या गणेशोत्सव आयोजनात आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत गणेश भक्तांची सुरक्षा, सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा खोपोली नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात गौरव करण्यात आला.

   खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी अनुप दुरे, पोलीस अधिकारी हरेश कळसेकर, यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, बेबी शेठ सॅम्युअल, किशोर पानसरे यांच्या उपस्थित सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वांच्या योगदानाबद्दल पोलीस अधिकारी कळसेकर उपनगराध्यक्ष अभिनेता कांबळे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार मानले. भविष्यात ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्या त्या वेळी सर्वांनी असेच सहकार्य करून आपले सामाजिक दायित्व निभविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.

   अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, सहज सेवा फाउंडेशन,  रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली, मोरया मित्र मंडळ, वरद विनायक मित्र मंडळ तसेच मोगलवाडी आणि भानवज येथील युवकांना यावेळी सन्मानित केले गेले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर यांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवून नेहमीच सर्वांचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

   गणेशोत्सवाच्या निमित्ताने युवकांपासून वृद्धांपर्यंत, सर्वच जाती धर्माच्या स्वयंसेवकांनी दिलेले योगदान, त्या योगदानाची प्रशासनाच्या वतीने घेतली गेलेली दखल आणि त्या अनुषंगाने झालेला सर्वांचा गौरव,  या बाबी खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या, सामाजिक सलोखा आणि एकात्मता टिकवणाऱ्या असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

इतर बातम्या