Breaking news

केंद्र शासनाच्या सहसचिवांची घेरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट; विद्यार्थ्यांशी साधला मराठी, हिंदी व इंग्रजीतून संवाद

मावळ | प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाचे मा. सहसचिव श्री. राजेश कुमार सिंग हे दि. १३ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांच्या अनुषंगाने महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनासह सार्वजनिक तक्रार निवारण व पंचायत धरोहर उपक्रम (Redressal of Public Grievances and Panchayat Dharohar Initiative) तसेच केंद्र शासनाच्या ‘मेरी धरोहर’ उपक्रमांतर्गत कोकण व पुणे विभागातील निवडक शाळा व ग्रामपंचायतींना ते भेट देत आहेत. या दौऱ्यादरम्यान श्री. राजेश कुमार सिंग यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घेरेवाडी येथे अचानक भेट देऊन शाळेतील शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. शाळेत आगमन होताच विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

      सहसचिवांनी शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता यांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून सहसचिवांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना श्री. राजेश कुमार सिंग यांनी अत्यंत आनंदाने, उत्स्फूर्तपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरे दिली. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सहसचिवांनी शाळेतील शिक्षक प्रियदर्शन भालेराव आणि मुख्याध्यापक डॉ. बाबासाहेब काळे यांच्याशी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली. “संपूर्ण तालुक्यामध्ये अशाच प्रकारच्या गुणवत्तावान व आदर्श शाळा आहेत का?” अशी विचारणा त्यांनी केली.

      त्यावर मुख्याध्यापक डॉ. बाबासाहेब काळे यांनी सांगितले की, “मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा शिक्षणाप्रती व शिक्षकांप्रती असलेला उदात्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी याच भावनेतून संपूर्ण जिल्ह्यात सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.”

शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विविध भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता, शैक्षणिक वातावरण आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केल्यानंतर मा. सहसचिव श्री. राजेश कुमार सिंग यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

       यानंतर नियोजित पाहणीच्या अनुषंगाने श्री. राजेश कुमार सिंग हे लोहगड किल्ला, भाजे-पाटण येथील ऐतिहासिक लेणी तसेच ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी रवाना झाले.

या दौऱ्यावेळी मावळचे गटविकास अधिकारी श्री. सेवक थोरात, पंचायत समिती सदस्य योगेश लोहर, सरपंच सोनाली बैकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश धानीवले, माजी सरपंच नागेश मरगळे, सदस्य पंढरीनाथ विखार, गणेश शेंडे तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

इतर बातम्या