तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागाचे आवाहन; बालकलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा संयुक्त उपक्रम
वडगाव मावळ : बालकांच्या कल्पनाशक्तीला रंगांची मुक्त अभिव्यक्ती देत त्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ आणि मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कै. चित्रकार सूर्यकांत काका वाळुंज यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाशी संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ यांच्या पुढाकारातून तसेच मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘रंग तुमचे, कल्पना तुमची... चित्रातून व्यक्त होऊ द्या तुमची प्रतिभा!’ या संकल्पनेतून बालकलाकारांना आपल्या कल्पनांना रंगरूप देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी निसर्गचित्र, फुलदाणी आणि रुमालावरील नक्षीकाम, तर इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी रक्षाबंधन, ध्वजारोहण आणि गणेशोत्सव हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. शालेय पातळीवर प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्र व सन्मान देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळचे अध्यक्ष राम कदमबांडे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच कला आणि सृजनशीलतेलाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. या चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळेल. त्यामुळे मावळातील सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
मराठी पत्रकार संघ, मावळ तालुक्याचे अध्यक्ष रामदास वाडेकर म्हणाले, “बालकांच्या हातातील रंग त्यांच्या कल्पनाविश्वाला अभिव्यक्ती देतात. कै. चित्रकार सूर्यकांत काका वाळुंज यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा मावळातील नवोदित बालकलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेच्या रंगातून या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
कै. चित्रकार सूर्यकांत काका वाळुंज मंचच्या वतीने प्रभावती वाळुंज यांनीही विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळचे पदाधिकारी व सर्व सभासद, मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका तसेच मावळ तालुका चित्रकला अध्यापक प्रयत्नशील आहेत.
संपर्कासाठी : पाटील सर – ९७६६७०६७५४, गोडे सर – ९१३०५८६१७९, जाधव सर – ९६२३२६६८६०.

















