गुणवत्तेचे वारकरी, पैठणीचे मानकरी! कान्हे केंद्रात शिष्यवृत्ती व नवोदय प्राप्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव
लोणावळा : कान्हे केंद्राच्या वतीने आयोजित एका स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. शनिवारी, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी 'रमेशकुमार सहानी', वडगाव येथे हा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख निर्मला काळे यांनी जाहीर केल्यानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना यथोचित सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी काले कॉलनी बीटचे विस्ताराधिकारी श्री. काळे, वडगाव बीटचे विस्ताराधिकारी श्री. वाळुंज, तसेच काले कॉलनी बीटच्या माजी विस्ताराधिकारी सौ. वहिले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
'पेन ते पैठणी'... प्रेरणेचा अनोखा प्रवास
केंद्रप्रमुख निर्मला काळे यांनी कान्हे केंद्राची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या शिक्षण परिषदेत शिक्षकांना पेन देऊन जो सन्मान आणि विश्वास दिला होता, त्या प्रेरणेची फलश्रुती आज शिक्षकांना 'पैठणी' देऊन केलेल्या विशेष सन्मानाने झाली. 'पेन ते पैठणी' हा शैक्षणिक यशाचा प्रवास खडतर होता, परंतु सौ. काळे यांच्या निरंतर मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे तो अत्यंत सुकर झाला, अशा भावना यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केल्या. शिक्षकांसाठी त्या एक दीपस्तंभ ठरल्याचा गौरवही यावेळी करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राजश्री अंबवले, रोहिदास आवारी, बजरंग सूर्यवंशी, उमेश माळी, गोरख जांभूळकर आणि दयानंद गवळी या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास कान्हे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, गुणवंत विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल रमेशकुमार सहानी, वडगाव व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

















