Breaking news

ग्लोबल गुरुजी उपक्रमात मावळचे नाव उज्ज्वल: चार शिक्षकांची सिंगापूर शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड

लोणावळा : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'ग्लोबल गुरुजी' उपक्रमांतर्गत सिंगापूरमधील आधुनिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ४५ प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील चार गुणवंत शिक्षकांनी बाजी मारत तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात भर घातली आहे.

मावळ तालुक्यातील निवड झालेले शिक्षक - मनेष हिरामण उघडे (जि. प. प्राथमिक शाळा, रामनगर), दिपाली श्याम अंगिर (जि. प. प्राथमिक शाळा, पाटण), मैना विलास सरवदे (जि. प. प्राथमिक शाळा, ब्राह्मणवाडी), श्रीनिवास चक्रपाणि शिंदे (जि. प. प्राथमिक शाळा, नवलाख उंबरे)

निवड प्रक्रियेचे स्वरूप

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे, या उद्देशाने 'ग्लोबल गुरुजी' उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील ३०३ समूह साधन केंद्रांमधून एकूाण १,१८७ शिक्षकांनी लेखी परीक्षा दिली होती. 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' (TISS) च्या सहभागाने पार पडलेल्या लेखी परीक्षा आणि कडक मुलाखत अशा बहुस्तरीय चाचणी प्रक्रियेतून पहिल्या टप्प्यात १५० शिक्षक पात्र ठरले. त्यातून अंतिम ४५ शिक्षकांची आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली.

       या अभूतपूर्व यशाबद्दल मावळच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज आणि संदीप काळे यांनी निवड झालेल्या चारही शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन व कौतुक केले. सिंगापूर दौऱ्यातून मिळणाऱ्या आधुनिक शैक्षणिक अनुभवांचा उपयोग मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिक्षकांना पुढील प्रवासासाठी आणि कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या