Mumbai pune Expressway l मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत जवळ प्रचंड वाहतूक कोंडी; प्रवासी बस रस्त्यात फिरून आडवी होऊन अपघात
कामशेत : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास प्रवासी बस घसरून आडवी झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. कामशेत बोगद्याजवळ सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस घसरल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बस कामशेत बोगद्याजवळ आली असता निसरड्या रस्त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस द्रुतगती मार्गावर फिरून आडवी उभी राहिली. बस आडवी झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील तिन्ही लेन बंद झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य धोका टाळण्यासाठी तसेच अन्य वाहनांचा अपघात होऊ नये यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. या रांगा सुमारे सात ते आठ किलोमीटरपर्यंत पोहोचल्याने वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
दरम्यान, महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस बाजूला काढली. त्यानंतर द्रुतगती मार्गावरील बंद झालेल्या लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या असून मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या अपघातात बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, पावसाळ्यात द्रुतगती मार्गावर रस्ता निसरडा होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.



















