Breaking news

राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात कलम 144 लागू; कडक पोलीस बंदोबस्त तैनात

लोणावळा : भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुरमू उद्या 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता लोणावळा शहरातील कैवल्यधाम या ठिकाणी येणार आहे. आय एन एस शिवाजी ते कैवल्यधाम असा त्यांचा प्रवास मार्ग असणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून लोणावळा शहर व परिसरामध्ये कलम 144 (1) (2) लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय राजशिष्टाचार विभाग यांच्या पत्रकान्वये उपविभागीय दंडाधिकारी मावळ मुळशी सुरेंद्र नवले यांनी सदरचा आदेश लागू केला आहे. आज मंगळवार दि. 28 नोव्हेंबर दुपारी 2 वाजलेपासून उद्या 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. 

      या काळात लोणावळा शहर व परिसरात ड्रोन कॅमेरा किंवा तत्सम उपकरणाचा छायाचित्रासाठी वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून लोणावळा शहर व संबंधित परिसर नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. या काळात सुट्टे पेट्रोल घेऊन जाणे, स्फोटक पदार्थ घेऊन जाणे, फटाके वाजविणे या गोष्टींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम 188 प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

      राष्ट्रपती यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून कडक बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असून आय एन एस शिवाजी ते कैवल्यधाम दरम्यानचा संपूर्ण रस्ता व त्याबाजुला असलेली अतिक्रमणे व रस्त्यावरील अडथळे हटविण्यात आले आहेत. आज दिवसभर या मार्गावर पोलीस विभागाकडून माॅकड्रिल घेण्यात आले याकरिता काही वेळ रस्ता बंद करण्यात आला होता तसेच परिसरात नेटवर्क जॅमर देखील लावण्यात आले होते. सुरक्षेचा मोठा प्रोटोकॉल असल्यामुळे सर्व खबरदारी घेतली जात आहे. कैवल्यधाम च्या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून सुरक्षेच्या सर्व पातळ्यांवर तपासणी सुरू आहे. उद्या राष्ट्रपती येण्याच्या वेळेत सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच काही काळ राष्ट्रीय मार्ग देखील थांबवण्यात येणार आहे. 

इतर बातम्या