सिंहगड शैक्षणिक संकुल, लोणावळा येथे सुविधा केंद्र सुरू; तांत्रिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अधिकृत सुविधा केंद्र (Facilitation Center - FC) सुरू केले आहे. हे केंद्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेल अंतर्गत अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, बी.एड. व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेत (CAP) विद्यार्थ्यांना सहाय्य करणार आहे.
हे सुविधा केंद्र मावळ, खोपोली, पनवेल, अलिबाग व आंदर मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली प्रवेश प्रक्रियेची सर्व सेवा — अर्ज भरती, कागदपत्र पडताळणी, निवड फॉर्म भरने व तांत्रिक मार्गदर्शन — सुलभतेने उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना आणि पालकांना मराठी व इंग्रजी भाषेत मार्गदर्शनही या केंद्रात दिले जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही हे केंद्र कार्यरत राहणार आहे, अशी माहिती सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी दिली.