Breaking news

आषाढी वारीचा उत्सव पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा हरिनामात उत्स्फूर्त सहभाग, वारकरी वेशभूषा अन् पालखीने भारावले वातावरण

लोणावळा : पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालयामार्फत भव्य अशी आषाढी दिंडी आज शनिवारी उत्साहात पार पडली. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सहभागी होत हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय केला.

     विद्यार्थिनींनी डोक्यावर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आणि पवित्र तुळशीचे रोप घेत सहभागी होत पारंपरिकतेला उजाळा दिला. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांचे आकर्षक सजावट पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले. टाळ, मृदुंग, ढोल आणि लेझीमच्या निनादात दिंडी शाळेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंद्रायणी पूल मार्गे श्रीराम मंदिर, भांगरवाडी येथे पोहोचली. तेथे सर्व विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेत रिंगण, फुगडी आणि हरिनाम संकीर्तनात सहभाग घेतला.

     या दिंडीचे लोणावळा शहराचे माजी नगरसेवक व शाळेचे माजी विद्यार्थी देविदास कडू यांनी स्वागत करत विद्यार्थ्यांमध्ये खाऊ वाटप करून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या सोबत माजी नगरसेविका अपर्णाताई बुटाला यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यशवंत बारवकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आनंद गावडे, पर्यवेक्षक रणपिसे सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव जागृत होत असून सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन साधले जात असल्याची भावना पालकांमध्ये दिसून आली.

इतर बातम्या

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत