Breaking news

Lonavala Crime News : लोणावळ्यात घरफोडी करत मोबाईल चोरला व अवघ्या 12 तासात मोबाईल विकताना सापडला

लोणावळा : लोणावळा शहरातील प्रियदर्शिनी हाॅलच्या शेजारी एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील मोबाईल चोरी झाल्याची घटना 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात चोरीची ही घटना नोंदविण्यात आली होती. कार्ला गडावर एकविरा देवीची यात्रा असल्याने पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे पथक (LCB) भाविकांच्या होणार्‍या चोरीच्या घटनांवर नजर ठेवून असताना त्यांना खबर्‍याकडून माहिती समजली की, एक रेकाॅर्डवरील गुन्हेगार गर्दी मध्ये चोरी करण्याच्या हेतूने फिरत आहे. तसेच त्याच्याकडे मोबाईल असून तो एक हजार रुपयांना विक्री करू पहात आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याने लोणावळ्यातून घरफोडी करत सदरचा मोबाईल चोरला असल्याची कबुली दिली. प्रियांशु उर्फ किटु प्रेम उठवाल (रा. सिद्धार्थ नगर लोणावळा) असे या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, सहा. फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार वैभव सुरवसे, निलेश सुपेकर, प्राण येवले, अजिज मिस्त्री यांनी ही कारवाई केली. लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या