मोठी बातमी : मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या कोथूर्णे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा
माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या पवन मावळ कोथूर्णे येथील अल्पवयीन बालिका अपहरण, लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या या प्रकरणातील आरोपीला आज शिवाजीनगर पुणे येथील जलद गती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे तर सदर हत्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीला मदत करणारी त्याची आई हिला देखील सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी तेजस महिपती दळवी (राहणार कोथूर्णे, या. मावळ, जि. पुणे) याला भादवी कलम 376 (A B) व 376 (A) व पॉस्को कलम 6 नुसार फाशी, भादवी कलम 376 (2) खाली जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 302 प्रमाणे फाशी व 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 363 प्रमाणे सात वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंड, पॉस्को क 4 नुसार जन्मठेप व 20 हजार रुपये दंड अशी विविध कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. असून त्याच्या आई सुजाता महिपती दळवी यांना भादवी कलम 201 खाली सात वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. बी.पी. क्षीरसागर कोर्टात हा खटला चालला तर या केसचे सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांनी काम पाहिले.
2 ऑगस्ट 2022 रोजी घराच्या अंगणामध्ये खेळत असणाऱ्या एका सात वर्षीय मुलीचे घराच्याच शेजारी राहणाऱ्या तेजस याने अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी त्याच्या आईने देखील त्याला साथ दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे प्रचंड मोठे पडसाद संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये उमटले होते. पवनानगर बाजारपेठ बंद ठेवत आरोपींना अटक करा व त्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी संपूर्ण मावळ तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली होती. अनेक नेत्यांनी व राजकीय पक्षांनी कोथूर्णे या गावी जात पीडित मुलीचे आई वडील यांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. वडगाव मावळ बार असोसिएशन यांनी देखील आरोपीची केस न घेण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण मावळ तालुका व पुणे जिल्ह्यामधून या घटनेचा निषेध नोंदवत सदरची केस जलद गती न्यायालयात चालवत आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी सर्वांनी केली होती. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपासी केस अधिकारी संजय जगताप, प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील, कोथूर्णे गावचे बित अंमलदार जितेंद्र दीक्षित व त्यांच्या संपूर्ण तपास टीमने या प्रकरणातील सर्व बारीक-सारीक पुरावे जमा करत अतिशय उत्तम प्रकारे या घटनेचा तपास केला. सर्व पुरावे व साक्षीदार न्यायालयासमोर हजर केले. जलद गती न्यायालया मध्ये मागील काही दिवसांपासून हा खटला सुरू होता. पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहायक फौजदार विद्याधर निचीत यांनी तर जिल्हा कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी काम पाहिले.
कोथूर्णे प्रकरणाची अंतिम सुनावणी आज 22 मार्च 2024 रोजी पार पडली. व प्रत्येकाने जी मागणी केली होती, त्याच पद्धतीने सर्व साक्षी पुरावे तपासत न्यायदेवतेने न्याय दिला. कालपासून संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली हा निकाल ऐकल्यानंतर सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायदेवतेचे आभार मानले आहेत. यापुढे लहान मुली, तरुणी, महिला यापैकी कोणावर सुद्धा अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे किंवा महिलांच्या विषयी चुकीच्या पद्धतीने वागणारे यांना या निकालाने जरब बसेल अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणाचा अतिशय गतिशीलतेने व सर्व बारकावे ध्यानात घेत तपास करणारे कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व कोथूर्णे बीटचे पोलीस अंमलदार जितेंद्र दीक्षित यांचे आभार ग्रामस्थांसह मावळकरांनी मानले आहेत.