Breaking news

Expressway Accident News : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर दूध टँकर चा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू तीन जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर खंडाळा घाटातील किमी 36.300 जवळ आज सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका दूध टँकर चा भीषण अपघात (Accident) झाला. 

       यामध्ये दूध टँकर ( GJ-18-BV 5559) हा चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला तो थेट कार क्रमांक (MH-14-VQ -1072) वर. आणि त्याच अवस्थेत तो घसरत जाऊन पुढे जाणारा कंटेनेर क्रमांक (MH - 46 -BB-9309) ला धडकला. त्यामुळे कंटेनर देखील जागीच उलटला. या भीषण अपघातात कार मधील संकेत अतुल अग्रवाल (वय 29) आणि प्रतिक अतुल अग्रवाल (वय 34 दोघेही राहणार खराडी, पुणे) हे नशिब बलवत्तर म्हणून आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. तर उलटलेल्या कंटेनर मधील चालक रितेश चांगदेव जगदाळे (वय 32, राहणार माण, सातारा) हा देखील किरकोळ जखमी  झालेला आहे. या अपघातात टँकर चालक पृथ्वीराज यादव (वय 40, रा. उत्तरप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला आहे.

      अपघाताची माहिती समजताच त्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी, आय आर बी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, आर टी ओ चे अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, मृत्युंजय देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी धाव घेतली. टँकरमधील मृत चालकाचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताच्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यंत्रणांनी बाधित वाहने बाजूला करुन काही वेळासाठी विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करत मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

इतर बातम्या