Khandala Ghat : नो एंट्रीतून वाहन घालण्याचा अगाऊपणा केला पण अंगलट आला !

लोणावळा : खंडाळा घाटातील अंडा पाॅईट येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने खोपोली शहरात जाणार्या व लोणावळ्याच्या दिशेने येणार्या सर्व उंच वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ दुचाकी व लहान कार वाहनांसाठी हा मार्ग ठेवण्यात आला असला तरी अनेक टेम्पो चालक व टेम्पो ट्रव्हलर्स सारखी वाहने, उंच साठा बनविलेल्या जीप या सारखी वाहने नियम मोडत या मार्गाने जाणार्या प्रयत्न करत हाईट बॅरिकेट्स मध्ये आडकत आहेत. उंच वाहनांना बंदी घातल्यानंतर अंडा पाॅईटजवळ व बोरघाट पोलीस चौकी या दोन ठिकाणी हाईट बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. आज एक मालवाहू टेम्पो या हाईट बॅरेकेट्सला आडकला व थेट दर्शनी बाजु हवेत गेली. चालकाला रेस्कू करुन खाली उतरविण्यात आले तसेच खाजगी क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजुला करत वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र या अपघातामुळे हाईट बॅरेकेट्सचा आयबिम वाकडा झाला आहे. मागील महिन्यात देखील एका वाहनाने धडक दिल्याने खांब वाकले होते. दहा दिवसापूर्वीच ते बदलत नविन लावण्यात आले होते. आजच्या अपघातात पुन्हा ते वाकडे झाले आहेत.
जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात सातत्याने वळणांवर होणारे अपघात रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. एका बस दुर्घटनेत येथे काही निष्पाप तरुणांना जीव गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याठिकाणी भेट देत सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अवजड व उंच वाहनांना जुन्या घाटातून जाण्यास बंदी घालण्यासाठी सदरची उपाययोजना करण्यात आली मात्र काही मुजोर वाहन चालक नियम मोडत अपघातांना निमंत्रण देत आहेत. या वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांनी तसेच आरटीओ कडून कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.