रोहन शिगवण एमपीएससी परीक्षेत राज्यात 18 वा; दैदीप्यमान यशाचे सर्वत्र कौतुक

संगमेश्वर/ प्रतिनिधी (विलास गुरव) : मौजे धामपूर (भडवळेवाडी) येथील कु. रोहन शिगवण यांनी MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात 18 वा क्रमांक पटकावत कोकणासह आपल्या गावाचेही नाव उज्वल केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर गावात आनंदाचं वातावरण असून, विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते कु. रोहन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार निकम म्हणाले, कोकणातील ग्रामीण भागातल्या मुलामुलींनी जिद्द, संयम आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा जिंकल्या. त्यामागे पालकांचा विशेषतः मातांचा आधार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची सतत साथ होती. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिलं, तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही. आपल्यालाही ही सकारात्मक चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आहे.दरवर्षी काही विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करणे ही समाजपरिवर्तनाची खरी दिशा आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमास तहसीलदार अमृता साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, विनोद कुमार शिंदे, राजेंद्र सुर्वे, शांताराम भायजे, सुशील भायजे, दीपक जाधव, दत्ता ओकते, दीपक शिगवण, अण्णा शिगवण, शशि घाणेकर, उमेश महाडिक, प्रकाश वीर, शिवाजी धनावडे, अक्षय चव्हाण, नाना कांगणे, तुकाराम मेस्त्री, लहू सुर्वे, सहदेव सुवरे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
कु. रोहन शिगवण यांच्या या यशामुळे धामपूर गावासह संपूर्ण तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, त्यांनी कोकणातील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.