Breaking news

Lonavala News | संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - IPS सत्यसाई कार्तिक

लोणावळा : संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी मार्गदर्शन केले. तरुणांमध्ये विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र ते आरोग्यासाठी व समाजासाठी कसे धोकादायक आहे याबाबतची माहिती कार्तिक यांनी विद्यार्थ्यांना दिली.

     पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदशानाखाली व लोणावळा विभागाचे सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून संकल्प नशा मुक्ती अभियान मागील दोन वर्षापासून राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत विविध स्वरूपाचे कार्यक्रम देखील लोणावळा उपविभागांमध्ये घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोणावळा परिसरातील मोठे महाविद्यालयीन कॅम्पस असलेल्या सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट अंतर्गत येणाऱ्या विविध आठ शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कोऑर्डीनेटर, एनएसएस, एनसीसी व इतर सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

     यावेळी बोलताना सत्यसाई कार्तिक म्हणाले सध्या अनेक कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यामध्ये दारू, गांजा, चरस, एमडी पावडर अशा विविध प्रकारच्या नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या कॉलेजमध्ये अशा प्रकारची कोणी नशा करत असल्यास अथवा अशी आमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत आम्हाला वैयक्तिक माहिती कळवावी. तसेच कॉलेजमध्ये समुपदेशन कक्ष (काऊसिंलीग सेल) स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, हॉस्टेलचे रेक्टर, पोलीस असे प्रतिनिधी यांची नेमणूक करणे. नशा करणारे विद्यार्थी यांना संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अशा समुपदेशन कक्षामध्ये आणून त्यांचे त्याठिकाणी समुपदेशन (काऊसिलींग) करणे, नशा करणारे विद्यार्थी यांच्या पालकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन करणे. कॉलेजचे मुख्य प्रवेशव्दार, हॉस्टेलचे प्रवेश व्दार व एक्झीट गेटवर तपासणी करणे. कॉलेज प्रशासनाचे माध्यमातून विद्यार्थी वास्तव्याचा ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन अशा दारू, गांजा, चरस, एमडी इत्यादी प्रकारची नशा कोण करते आहे का? याची तपासणी केली जावी. कॉलेज लगत असलेली पोलीस चौकी सक्रीय करून त्याठिकाणच्या पोलीस स्टाफच्या मदतीने कॉलेज कॅम्पस व हॉस्टेल परीसरात पेट्रोलींग करण्यात येईल. कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर कॉलेज प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कॉलेजमधील विद्यार्थी यांना नशा पुरवणारे डिलर यांची माहिती संकलीत करून त्यांच्यावर देखील प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

      वरीलप्रमाणे विविध विषयांवर मार्गदर्शन व सूचना यावेळी करण्यात आल्या. कॉलेजमधील तरूण मुले-मुलांमध्ये वाढत चाललेली विविध प्रकारची नशा रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने हे संकल्प नशा मुक्ती अभियान सुरू केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

इतर बातम्या